यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्यासाठी उद्या गुरुवार, ४ एप्रिल हा अखेरचा दिवस आहे. आताच्या क्षणापर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील नागरिकांची उमेदवाराबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महायुतीकडून कोण उमेदवारी दाखल करणार हे गुलदस्त्यात असले तरी, अर्ज दाखल करण्याची, सभेची आणि रॅलीची संपूर्ण तयारी महायुतीने केली आहे.

मंगळवारी मंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी या दोघांनाही मुंबई येथे तातडीने बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत या नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. आज बुधवारी संजय राठोड यवतमाळात परत आले आणि उद्या गुरुवारी महायुतीचा उमेदवार नामांकन दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी काही माध्यमांशी बोलताना दिली. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळ येथे येणार असल्याची माहिती आहे. स्थानिक पोस्टल ग्राऊंडवर महायुतीची सभा होणार आहे. आधी सभा, नंतर रॅली आणि शेवटी नामांकन अर्ज दाखल करण्यासंदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. या सभेच्या तयारीसंदर्भात आज बुधवारी दुपारी महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत गुरुवारच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. उमेदवार कोणीही असला तरी पूर्ण तयारी झाली आहे.

हेही वाचा – आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा; म्हणाले, “तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर…”

मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी वाहने, भोजन, पाणी आदी व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता बघता दुपारच्या आधी नामांकन दाखल करण्याचा प्रयत्न राहणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मंगळवारी आमदार आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला. त्यापूर्वी पोस्टल मैदानात सभाही झाली. महाविकास आघाडीपेक्षा अधिक मोठी सभा आणि रॅली काढण्याचे नियोजन सुरू असून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली आहे.

मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर मंत्री संजय राठोड हे यवतमाळात परत आले. मात्र, भावना गवळी या अद्यापही मुंबईत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काही वाहिन्यांवर संजय राठोड यांना उमेदवारी मिळाल्याचे वृत्त झळकल्याने महायुतीत नेमके काय चालले आहे, यावर नागरिकांमध्ये खल सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा उमेदवार घोषित होणारच असल्याने आता प्रत्यक्ष उमेदवार कोण राहील, हे जाहीर झाल्यावरच या चर्चांवर पडदा पडणार आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार राहणार आहे. त्यामुळे महायुतीत उमेदवारीसाठी गवळींच्या ‘भावनां’ची कदर होणार की, मुख्यमंत्री ‘संजय’अस्त्र बाहेर काढणार, अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – “काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

भावना गवळींच्या निर्णयाकडे लक्ष

महायुतीने भावना गवळींना उमेदवारी दिली नाही तर वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. भावना गवळींना डावलले तर त्या काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संजय राठोड महायुतीचे उमेदवार राहिल्यास येथील लढत रंगतदार होणार असून दोन ‘संजय’चा सामना रंगणार आहे.

Story img Loader