यवतमाळ : ग्रामीण भागात शिकणारी मुलं एरवी आकाशात झेप घेण्याचे स्वप्न क्वचीतच बघू शकतात. आकाशात घिरट्या घालणारे विमान जमिनीवरून बघून आनंद घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चक्क विमानाने प्रवास करण्याचा योग आला तर! निश्चितच हा कौतुकाचा क्षण ठरेल. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांना विमानात बसण्याचा योग आला, आणि हे विद्यार्थी बुधवारी रात्री नागपूर विमानतळावरून हवाई सफरीसाठी रवानाही झाले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महादीप स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या ४१ विद्यार्थ्यांना ही विमानवारी घडविली आहे. या परीक्षेचे हे तिसरे वर्ष होते. बुधवारी जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण केल्यानंतर हे सर्व विद्यार्थी शिक्षकांसह बंगळुरू, म्हैसूर येथे हवाई सहलीसाठी रवाना झाले. जिल्हा परिषदेने शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा महादीप स्पर्धा परीक्षा घेतली. एक लाख ८३ हजार विद्यार्थ्यांची चार स्तरावर सात फेऱ्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यातून तावून सुलाखून ४१ विद्यार्थ्यांची विमानवारीसाठी निवड करप्यात आली. बुधवारी या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना विमानप्रवासासाठी रवाना करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की होते.
हेही वाचा : Wardha Leopard: सावधान! वर्ध्यात बिबट, हिंगणघाटात वाघाचा वावर
शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. निता गावंडे, डॉ. शिल्पा पोल्पेल्लीवार, श्रीधर कनाके, गरशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, मंगेश देशपांडे, गणेश मैघने, चेतन कांबळे, राजू काकडे आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी गुणवत्ताप्रात विद्यर्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्राविण्यप्रात्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. त्यानंतर या ४१ विद्यार्थ्यांचे विमान नागपूरहून बंगळुरू, म्हैसुरकडे रवाना झाले. ७ ते११ ऑगस्टपर्यंत ही सहल राहणार आहे. यात विद्यार्थी दक्षिण भारतातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहेत. खेड्यापाड्यातील चिमुकल्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावणारा हा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यातील एकमेव आहे. या उपक्रमात सहकार्य करणारे चंद्रकिशोर कडू, विजय ढाले, राजकुमार भोयर, अथहर अली, जिशान नाझी, अमोल मेदोडक, मिना पुरी यांचाही सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : Bachchu Kadu: “मोर्चा अडवू नका, अन्यथा…”, बच्चू कडू यांचा इशारा
घाटंजी तालुक्याची हॅट्ट्रिक
यापूर्वी दोनवेळा झालेल्या महादीप परीक्षेत घाटंजी तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले. आता तिसऱ्यांदा निघालेल्या विमानवारीतही जिल्ह्यातील ४९ पैकी तब्बल १५ विद्यार्थी घाटंजी तालुक्यातीलच आहेत. त्यानंतर उमरखेडमधून ९, यवतमाळ ४, दारव्हा ३ , बाभूळगाव, महागाव व नेरमधून प्रत्येकी २, तर राळेगाव, कळंब, मारेगाव, पुसद या तालुक्यातून प्रत्येकी एक विद्यार्थी विमानवारीसाठी पात्र ठरला आहे. ‘महादीप’सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व कळेल. शिवाय शालेय वयातच त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी होईल. यातून भविष्यात उत्तम प्रशासकीय अधिकारी, राजकारणी तयार होतील, असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले.