यवतमाळ : शालेय जीवनापासून पर्यावरण संरक्षणाचे काम करत असलेल्या येथील बोधिसत्व खंडेराव या विद्यार्थ्याने केलेल्या पर्यावरण विषयक केलेल्या कामावर आधारित लघुपटाची आंतरराष्ट्रीय किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. उद्या १० जानेवारी रोजी हा लघुपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने या लघुपटाची निर्मिती केली, हे विशेष.
बोधिसत्वच्या पर्यावरण विषयक कामावर गतवर्षी नॅशनल जिओग्राफीक चॅनलने एक लघुपट तयार केला होता. तो जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने विविध चॅनलवरून प्रसारित झाला होता. किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव आहे. यावर्षी महोत्सवात जगभरातील गाजलेले पर्यावरण विषयक चित्रपट आणि लघुपट दाखवले जात आहेत.बोधिसत्व खंडेराव याने वयाच्या सहाव्या वर्षी सामाजिक वनीकरणाच्या कामासाठी पुढाकार घेतला वेगवेगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये, बचत गट, ग्रामपंचायत, समर कॅम्प, एनसीसी आणि एनएसएस कॅम्प, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम, अशा अनेक ठिकाणी जाऊन पाचशेहून अधिक सामाजिक वनीकरणाच्या कार्यशाळा आयोजित केल्या.
हेही वाचा… अकोल्यातील गुन्हेगारीविरोधात शेकडो विद्यार्थी उतरले रस्त्यावर, शिवसेना ‘उबाठा’चा मूक मोर्चा
रँप्ड सीडबॉल मेथड, ग्रीन पाऊस मेथड, पर्ण-बीज मेथड, मॅजिक सॉक्स मेथड या सामूहिक वनीकरणाच्या चार नवीन पद्धती विकसित केल्या. ‘द यंगेस्ट इन्व्हायरमेंटल अँक्टिव्हिस्ट’ म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. सिंगल युज प्लास्टिक विरोधात आंदोलन सुरू केले आणि हजारो विद्यार्थ्यांना सिंगल युज प्लास्टिक न वापरण्याची सामूहिक शपथ दिली. कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देण्याकरिता जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन १० हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले.नो प्लॅस्टिक रॅलीचे आयोजन केले. स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ येथील विद्यार्थ्यांच्या मदतीने औषधी महत्त्वाच्या सत्तावीस झाडांची लागवड करून जागृती वनाची स्थापना केली.
अमेरिकेतील ‘ॲक्शन फाँर नेचर’ या संस्थेकडून ‘द यंग इंटरनॅशनल इको हिरो अवॉर्डही’ बोधिसत्वला देण्यात आला. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ‘कॅरी युवर ओन ग्लास’ हे आंदोलन सुरू केले. कुठलेही इंधन न वापरता एका तासात शंभर किलो धान्य साफ करणाऱ्या पर्यावरण पूरक धान्य सफाई यंत्राचा शोध लावला.
हेही वाचा… नागपूर : प्रेयसीच्या हट्टापोटी प्रियकर पोहचला कारागृहात
यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ४० महिलांना या धान्य सफाई यंत्रांचे मोफत वाटप केले. नॅशनल जिओग्राफिक चॅनलने बोधिसत्वच्या याच पर्यावरण विषयक कामावर आधारित लघुपटाची निर्मिती आणि प्रसारण केले. वसुंधरा फिल्म फेस्टिवलमध्ये हाच लघुपट दाखवला जाणार आहे. यवतमाळच्या तरुण पर्यावरण कार्यकर्त्याची नॅशनल जिओग्राफीकने घेऊन आता हा लघुपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होत असल्याने यवतमाळात आनंद व्यक्त होत आहे.