नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे दीक्षांत समारंभाच्या नावावर अवास्तव शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाला १.२५ लाख विद्यार्थी प्रवेशित असून प्रतिविद्यार्थी ४५० रुपयांप्रमाणे पाच कोटींहून अधिकचे शुल्क वसूल केले जाते. विशेष म्हणजे, दीक्षांत सोहळ्याचा खर्च केवळ ४० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्क वसुली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाकडून दोन वर्षांआधी शैक्षणिक शुल्कवाढीचा मुद्दा गाजला होता. आता दीक्षांत सोहळ्याच्या नावावर वसुली सुरू असल्याचा आरोप होत आहे. विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत सोहळा २४ फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे ४५० रुपये शुल्क राज्यातील इतर विद्यापीठांपेक्षा अधिक आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाला जास्तीत जास्त अंदाजे २५ लाख रुपये खर्च आहे. पदवी प्रमाणपत्राच्या छपाईसाठी १५ लाख जोडले तर एकूण ४० लाख रुपये होतात. त्यामुळे विद्यापीठ पाच कोटींहून अधिकचा नफा मिळवत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा : नायलॉन मांजामुळे वीज पुरवठा खंडित; विद्युत तारा तुटल्या, १५ ते २० मीटर जळाले…

पदवी प्रमाणपत्रामध्ये सुधारणा किंवा दुसरी प्रत काढायची असल्यास विद्यार्थ्यांकडून ६०० रुपये घेतले जातात. मुक्त विद्यापीठ ही उच्च शैक्षणिक संस्था असून नफा मिळवणे हा संस्थेचा उद्देश नाही. शिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुदत ठेवीच्या स्वरूपात बँकेकडे एक हजार कोटी रुपयांहून अधिकच्या ठेवी आहेत. असे असतानाही दीक्षांतच्या नावावरील वसुली थांबवावी, अशा मागणीचे निवेदन माजी विद्वत परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी राज्यपालांना दिले आहे.

आकडे काय सांगतात?

मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाला १ लाख २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्यावर आकारण्यात येणाऱ्या ४५० रुपयांना १,२५,००० ने गुणल्यास ५ कोटी ६२ लाख ५०० रुपये शुल्क होते. याशिवाय दीक्षांत समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये अमानत रक्कम घेऊन ‘शेला’ दिला जातो. कार्यक्रम संपल्यावर शेला परत करणाऱ्यांकडून देखभाल दुरुस्तीच्या नावावर ५० रुपये कपात करून केवळ ४५० रुपये परत केले जातात.

मुक्त विद्यापीठ पदवी प्रमाणपत्रासाठी ‘ब्लॉक चेन तंत्रज्ञान’चा वापर करते. या तंत्रज्ञानामुळे पदवीवर एक ‘क्यूआर कोड’ दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी कुठल्याही कंपनीमध्ये नोकरीसाठी गेला तरी त्याची पदवीची सत्यता तपासणे सोपे होते. या तंत्रज्ञानासाठी खर्च वाढला आहे. दीक्षांतसाठी विद्यार्थ्यांकडून अधिकचे पैसे घेणे हा आमचा उद्देश नाही. उलट नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार पदवी प्रमाणपत्र देण्यावर आमचा भर आहे. – प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना शिक्षणाची संधी मिळत नाही. परिणामी, असे समाजघटक उच्च शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये, हे मुक्त विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. अशा विद्यार्थ्यांकडून वसुली निश्चितच निषेधार्थ आहे.

प्रा. डॉ. संजय खडक्कारमाजी विद्वत परिषद सदस्य, मुक्त विद्यापीठ, नाशिक.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ycmou charging unreasonable fees in the name of convocation ceremonies zws