नागपूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना साऱ्यांनाच उत्सुकता असते ती नवे वर्ष कसे असेल याची आणि मग सुरू होतो तो दिनदर्शिकांचा शोध. यंदाही अनेकांना तेच वाटतेय, की २०२५ हे वर्ष कसे असेल याची. मात्र, जसा माणसाचा पुनर्जन्म होतो असे म्हणतात ना, तसाच पुनर्जन्म झाला आहे तो १९४७ या वर्षाचा. होय.. १९४७ आणि २०२५ हे वर्ष अगदीच सारखे आहे. अंकगणिततज्ञ आणि तीन हजार वर्षाची दिनदर्शिका तोंडपाठ करण्याचा विक्रम करणारे सुभाष दाभिरकर यांनी ही माहिती दिली आहे. नवीन वर्ष सुरु होताच नविन दिनदर्शिका हाती घेऊन त्यातील सणवार, वाढदिवस, सार्वजनिक सुट्या असे सारेच शोधायला लागतात. यावर्षीही तेच होणार आणि यात काहीही नाविन्य नाही. मात्र, यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये काहीतरी नाविन्य आहे.
हेही वाचा >>> ‘मॅडम… माझ्या हृदयातून मुलगा हरवला हो… मला शोधून द्या…’
२०२५ या वर्षातील तारखा आणि दिवस हे १९४७ च्या दिनदर्शिकेतील बऱ्याच प्रमाणात मिळतेजुळते आहेत. १९४७ आणि २०२५ ची दिनदर्शिका जवळपास एकसारखी आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्यदिन अर्थातच १५ ऑगस्ट ला आला होता, तर यावर्षी सुद्धा १५ ऑगस्टला शुक्रवारच आहे. एवढेच नाही तर १९०२, १९१३, १९१९, १९३०, १९४१, १९५२, १९५८, १९६९, १९७५, १९८६, १९९७, २००८, २००३, २०१४ या वर्षातील तारखा आणि वर जवळपास सारखेच आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांची मात्र यंदा घोर निराशा झाली आहे. नवीन वर्षात चार शासकीय सुट्ट्या रविवारी आल्या आहेत आणि त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या सुट्ट्यावर संक्रांत आली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीला रविवार आहे. ३० मार्चला येणारा गुढीपाडवा देखील रविवारीच आला आहे. सहा एप्रिलला असणारी रामनवमी देखील रविवारी याच दिवशी आहे. तर सहा जुलैला येणारा मोहरम हा सणदेखील रविवारी आहे. याशिवाय दोन ऑक्टोबरला दसरा आणि महात्मा गांधी जयंती सुद्धा एकाच दिवशी आहे. त्यामुळे आणखी एका सुटीला सरकारी कर्मचाऱ्यांना मुकावे लागणार आहे. याशिवाय येणाऱ्या वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना बारा एप्रिलला शनिवार, २३ एप्रिलला रविवार आणि १४ एप्रिलला आंबेडकर जयंती अशा सलग तीन सुट्या आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सहलीचा बेत, सहलीचे नियोजन करण्यात कोणताही अडथळा येणार नाही.