चंद्रपूर: हवामान खात्याने २५ ते २७ एप्रिल या कालावधीत उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. तीन दिवसांपासून उन्हाचा पारा ४५.५, ४५.६ व ४५.८ अशा चढत्या क्रमाचा राहिला आहे. उष्णतेत चंद्रपूर जगात तथा देशात सातत्याने पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. उष्णतेची लाट बघता ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावर परिणाम झाला आहे.
वाघ आणि वन्यप्राण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या जंगलात सध्या पर्यटकांची संख्या झपाट्याने घटली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड उकाडा आणि येथील तापमान देशातील सर्वाधिक असल्याच्या बातम्यांनी पर्यटकांची धास्ती घेतली आहे. दरम्यान ताडोबा व्यवस्थापनाने सफरीची दुपारची वेळ ३ ते ७ अशी बदललेली आहे.
या आठवड्यात अचानक उन्हाची तीव्रता वाढली आहे. मागील तीन दिवसात सातत्याने ४५.६, ४५.८ व ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने उन्हाची तीव्रता बघता शाळांच्या वेळा तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वेळही बदलली आहे. हवामान खात्याकडून उन्हाचा यलो अलर्ट जाहीर झाल्यानंतर आता ताडोबाच्या सफारीवर देखील त्याचा परिणाम होतांना दिसून येत आहे.
उन्हाच्या भीतीने अनेक पर्यटकांनी बुकिंग रद्द केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडोबात एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यासाठी ऑनलाइन बुकिंग केलेले अनेक पर्यटक आता आपली सहल रद्द करत आहेत. ताडोबात आधीच पोहोचलेले पर्यटकही खुल्या जीपमधून जंगल सफारीला जाण्याऐवजी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये वेळ घालवत आहेत. सहसा, उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्यांमुळे ताडोबा पूर्णपणे बुक केला जातो, परंतु यावेळी, एप्रिल-मेसाठी अनेक प्रवेशव्दारावर सफारी स्लॉट्स रिक्त आहेत. ताडोबातील जंगल सफारीसाठी पर्यटकांना खुल्या जीपमध्ये पाच तासांपेक्षा जास्त वेळ काढावा लागतो.
मात्र तापमान ४५.५ ते ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने ही सफारी पर्यटकांसाठी आव्हानात्मक बनली आहे. इतक्या कडक उन्हात जंगलात फिरणे कठीण होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर अनेकांनी केल्या आहेत.ताडोबातील सर्वात लोकप्रिय मोहुर्ली गेट दररोज सकाळी आणि संध्याकाळी ३२ वाहनांना प्रवेश देते. परंतु आता येथेही बुकिंग उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नागपुरातून येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या कोलारा गेटवर सर्वसाधारण कोट्यातून केवळ १२ आणि तत्काळ कोट्यातून ६ वाहनांनाच प्रवेश दिला जातो, मात्र आता येथेही गर्दी नाही.
उष्णतेमुळे पर्यटकांच्या संख्येत झालेली घट तात्पुरती असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सकाळी तापमान कमी असताना पर्यटकांनी सफारीचा आनंद घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सनेही एसी वाहनांची सुविधा वाढवण्याचा विचार केला आहे. ताडोबासारख्या प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्यात उष्णतेचा हा परिणाम चिंताजनक आहे. तापमान लवकर कमी न झाल्यास पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते.