वर्धा : कपाशी व सोयाबीन पिकावर यलो मोजॅक रोगाने थैमान घातले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून तातडीची मदत देण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षण करीत मदतीचे प्रस्ताव त्वरित सादर करीत पाठविण्याचे निर्देश वर्धा जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
यावर्षी पावसाचे चक्र बदलले. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झाला. त्यातच सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नव्वद टक्के पीक पिवळे पडले. कपाशी सडली. खरीपाची ही दोन्ही पिके महत्वाची आहे.त्यावरच शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.पण आता हाती काहीच राहले नाही. म्हणून त्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. ही मदत खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्वरित मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची तात्काळ दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असे डॉ. भोयर म्हणाले.