ख्रिस्तोफर चॅपेल यांचे प्रतिपादन
पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी आपले शरीर बनले असून, त्याची समुपासना करणे हे आपले कर्तव्य आहे. तो शांतीचा मार्ग आहे. योग, ध्यानाभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला ही शांती प्राप्त होऊ शकते. योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे, असे प्रतिपादन इंडिक अॅंड कम्पॅरेटिव्ह थिऑलॉजीचे प्रा. ख्रिस्तोफर की चॅपेल यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैन स्टडीज् यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रभारती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय दर्शन विभागातर्फेसंयोजित या व्याख्यानमालेला अध्यक्षस्थानी कुलगुरू श्रीनिवास वरखेडी होते. प्रास्ताविक डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले.
यावेळी प्रा. ख्रिस्तोफर चॅपेल म्हणाले, भोगासक्तीमुळे व्यक्ती अस्वस्थ आणि अशांत होते. शांती हवी असेल तर निसर्गाशी एकरूप होऊन, आपले मूळ स्वरूप जाणून घेऊन, योगाभ्यास करून ही शांतीप्राप्त करता येते. यासाठीच विविध बीजमंत्र आणि त्यांचा जप व ध्यान आवश्यक आहे. श्रीमती चॅपेल यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रो. चॅपेल यांच्या व्याख्यानानंतर डॉ. मंजू जैन आणि डॉ. अर्चना जैन यांनी पंचमहाभूतांची समुपासना करणाऱ्या विविध बीजमंत्रांचे उच्चारण व ध्यान करवून घेतले.
कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी आयोजकांचे अभिनंदन करून अलौकिक ध्यानानुभव प्राप्त करून दिल्याबद्दल प्रो. चॅपेल यांचे आभार मानले. संचालन सुनीता वधावन यांनी तर आभार भारतीय दर्शन विभाग प्रमुख डॉ. कलापिनी अगस्ती यांनी मानले.