लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : लोकशाहीचे रक्षण करण्याच्या चर्चेमध्ये सुद्धा लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नसल्याची सद्यस्थिती आहे. हा आमच्यावर नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी केली. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असेल तर त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर लाजिरवाणी वेळ आणली, असे देखील ते म्हणाले.

अकोल्यात वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांच्या सभेत गोंधळ घातला. यादव यांचे भाषण रोखण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर योगेंद्र यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात १०० च्यावर व्याख्यान दिले आहेत. मात्र, आजपर्यंत अशी घटना कधीही घडली नव्हती. ते कोण आहेत, ज्यांना माझ्या बोलण्याची भीती होती. निर्भयता आमचा संकल्प आहे. अकोल्यात पुन्हा भाषण देण्यासाठी निश्चित येईल.

आणखी वाचा-एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे निमंत्रण, तर दुसरीकडे मेळाव्याचे आयोजन; आमदार केचे काय करणार?

ॲड. प्रकाश आंबेडकर हल्ल्याला प्रोत्साहन देतील, असे ते व्यक्ती नाहीत. वंचितच्या कार्यकर्त्यांनी कुणाच्या सांगण्यावर हा हल्ला केला असेल तर त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सुद्धा लाजिरवाणी वेळ आणली आहे. भारत जोडो अभियान विविध संस्था, संघटनेचे आंदोलन आहे. आम्हाला निवडणूक लढायची नाही. संविधान हेच आमचे उमेदवार आहेत. प्रश्न विचारणे यात काही गैर नाही. त्याचे उत्तर देखील आम्ही देऊ इच्छित होतो. मात्र, बोलूच दिले नाही. त्यांनी संविधानाचे उल्लंघन केले. गोंधळ घालणे, हल्ला करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अशोभनीय आहे, असे यादव म्हणाले.

भाजप,संघावर टीका

भाजप व संघ यांचा देशाच्या संविधानावर हल्ला आहे. त्याविरोधात आम्ही बोलण्यासाठी आलो होतो. यावर बोलू नये, अशी काहींची इच्छा आहे, असा टोला देखील योगेंद्र यादव यांनी नाव न घेता लगावला.

आणखी वाचा-अवैध औषधविक्री करणाऱ्या मुंबईतील डॉक्टरला भंडाऱ्यात अटक

‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ यावर व्याख्यान

‘महाराष्ट्र डेमॉक्रेटिक फ्रंट’च्यावतीने विचारवंत तथा राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या विचारसभेचे सोमवारी दुपारी शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ यावर विषयावर योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू होण्याअगोदरच वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत योगेंद्र यादव यांना भाषण करण्यापासून रोखून धरले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav talk on vanchits uproar says this is an attack on babasahebs constitution ppd 88 mrj