अकोला : जातीच्या नावावर वाटणाऱ्या काँग्रेसने १९४७ पासून देशासोबत विश्वासघात केला. काँग्रेसचे अस्तित्व आता संपवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, उमेदवार रणधीर सावरकर व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

हेही वाचा – ‘बटेंगे तो कटेंगे यासाठी म्हणतो’, मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची स्पष्टोक्ती, ‘रझाकारांच्या अत्‍याचारांवर..’

पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे.

१९४७ पासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती. मात्र, काँग्रेसने देशासोबत धोका केला. अखंड भारताचे तुकडे केले. आता काँग्रेस अध्यक्ष खरगे माझ्यावर राग व्यक्त करीत आहेत. माझ्यापेक्षा हैदराबादच्या निजामावर त्यांनी राग काढावा. माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही.

निजामाच्या अत्याचारावर पडदा टाकण्याचे काम काँग्रेस करीत आहे, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. जिथे विभागणी होते, त्याच ठिकाणी हिंदू उत्सवादरम्यान दगडफेक होते. त्यामुळे मतांचे विभाजन होऊ देऊ नका. महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात आहे. ते लव जिहाद, लँड जिहाद सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चुकूनही त्यांचा विचार करू नका. अन्यथा आपले सण गणेशोत्सव, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होईल. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत वाटले जाऊ नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारताच्या सीमा सुरक्षित आहे. ५०० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. हा डबल इंजिन सरकारचा लाभ आहे. सर्व समस्यांचे समाधान केवळ डबल इंजिन सरकार असू शकते, असे देखील ते म्हणाले.

महायुतीचाच मुख्यमंत्री होणार – बावनकुळे

२० तारखेची निवडणूक १४ कोटी जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. काँग्रेस नेत्यांचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे. काँग्रेसने काहीही केले तरी भाजप लाडकी बहीण योजना सुरूच ठेवेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या ५८ योजना प्रभावीपणे राबवणार आहे. निवडणुकीनंतर महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. तिकीट दिले नाही म्हणून समोर काही गद्दार उभे आहेत, अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर देखील निशाणा साधला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath akola criticizes congress ppd 88 ssb