लोकसत्ता टीम
बुलढाणा : पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून पाणी मिळावे यासाठी लढा उभारणाऱ्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ येथील रहिवासी कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाइड नोट सापडली असून जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळेच शासनाच्या धोरणाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे कैलास नागरे यांनी म्हटले आहे. कैलास नागरे यांना राज्य सरकारने युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
पंचक्रोशीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात ७ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी उपोषण सोडले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता न केल्याने २६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका कैलास नागरे यांनी घेतली होती. मात्र त्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र दोन महिने उलटूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले.
गावकरी आक्रमक
कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.या चिठ्ठीत कैलास नागरे यांनी शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहचले असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र जोपर्यंत कैलास नागरे यांच्या मागण्या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
‘माझी आहुती पाण्याच्या हमीसाठी’
नागरे यांनी तब्बल चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात विविध मुद्ध्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात नमूद आहे की, आमच्यकडे सिंचनाच्या सर्व सुविधा, पण पाणी नाही; खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. माझ्यावर केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा; राख आनंदस्वामी धरणात टाका; रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका, असेही त्यात नमूद आहे. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे, असे आर्त आवाहन त्यांनी केले आहे. मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो अन् मुलं, बाबा, बायको यांनाही शून्य करूनच जातोय, असे लिहित त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदारांनाही आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्या
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी लढा उभारला होता. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही कैलास नागरेंनी शेतीसाठी पाणी द्या अशी मागणी केली आहे.. आमचा पाण्यासाठीचा संघर्ष खूप जुना आहे. तो तात्काळ मार्गी लावा, आमच्या पंचक्रोशीत जर बारमाही पाणी आले तर शेतकरी भरकटणार नाही असेही कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे..
आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, फक्त शेतीला हमी पाणी नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही, त्यांचा आर्थिक समतोल बिघडतो आणि कर्जबाजारी होतो अन् वैफल्यग्रस्त होऊन तो नैराश्येच्या गर्तेत जातो. त्याला जगणे असह्य होते असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे. या सुसाईड नोट मध्ये कैलास नागरे यांनी शेतीच्या वादाचाही उल्लेख केला आहे. गावकऱ्यांनी हा वाद आपसात बसून सोडवावा असेही त्यांनी लिहिले आहे.
मी असमर्थ ठरलो…
शेतीच्या उत्पादनात सातत्य नसल्याने मी भरकटलो. घडगाडा शेतीचा गाडा, कोर्टकचेरी, मुलांचे शिक्षण, सुखदुःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो.. मी स्वतः शून्य झालो, मागेही शून्य सोडून चाललो, मुलं, बाबा, बहिणी, भाऊजी, बायको यांनाही शून्य करूनच जातोय. माझ्या बाबांच्या भाषेत हे प्रारब्धाचे भोग आहेत, ते सर्वांनाच भोगावे लागणार, असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे..
मुलांचे पालकत्व स्वीकारा..
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री,खासदार, आमदार यांनी आमच्या मुलांचे पालकत्व कृपया करून स्वीकारावे व वादग्रस्त शेतीचा वाद मिटवावा, असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे