नागपूर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने वस्तीत राहणाऱ्या तरुणीचे अपहरण करून वर्धा शहरात नेले. तेथे एका खोलीत कोंबून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. विरोध केला असता त्याने तिला मारहाणही केली. नागपूरला परतल्यावर पीडितेने वाठोडा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणाला अटक केली. विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता (२१) रा. वाठोडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
विशालने शिक्षण सोडले आणि गुन्हेगारीत प्रवेश केला. त्याचे अनेक गुन्हेगारांशी संबंध आहेत. त्याच्यावर काही पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीला त्याने जाळ्यात ओढले. वारंवार तिच्या घरी जाऊन तिला भेटण्यासाठी गळ घालत होता. तिच्या आईवडिलांसमोरच तिला प्रेमाची मागणी घालत होता. त्यामुळे तिचे आईवडिलही दहशतीत होते. ३१ मे रोजी विशालने मुलीला भेटण्यास बोलावले. ती न आल्याने तिला चौकातून जबरीने दुचाकीवर बसवून वर्धा येथे घेऊन गेला. तेथे एका खोलीत कोंडून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. तिने विरोध केला असता आरोपीने तिला जबर मारहाण केली. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी वाठोडा ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
हेही वाचा – गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच
मुलीला संधी मिळताच ती वर्ध्यावरून पळून नागपूरला परतली. तिने घडलेल्या प्रकाराची कुटुंबीयांना माहिती दिली. वाठोडा ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अत्याचार, अपहरण व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवून विशालला अटक केली.