अकोला : एखाद्या ‘ड्रामेबाज’ चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरुणाने चक्क आते व मामे बहिणी असलेल्या दोन तरुणींशी गुपचुप लगीनगाठ बांधली. पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन पतीने दुसरीशी लग्न केले. नंतर अमरावती येथे गेलेल्या पहिल्या पत्नीला ‘व्हिडिओ कॉल’ करून आता येऊ नको, असे देखील नवरोबाने बजावले. त्यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या पहिल्या पत्नीने आपल्या पतीला दिवसाढवळ्या आकाशातील तारे दाखवले आहेत. दोन बायका करणाऱ्या नवरोबाची पोलीस ठाण्यातच झालेली फजिती काय विचारता? या प्रकरणाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
चित्रपटांमध्ये अनेक वेळा पहिली पत्नी असतांना गुपचूपपणे दुसरे लग्न, ते लपवण्याची पतीची धडपड, त्यातून निर्माण होणारे विनोद व प्रकरण उघडकीस आल्यावर शेवटी होणाऱ्या धावपळीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. अकोला जिल्ह्यात मात्र हा सर्व प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा गावातील तरुणाची २७ वर्षीय तरुणीसोबत एका लग्न समारंभात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी नऊ महिन्यांपूर्वी न्यायालयात लग्न केले. लग्न झाल्यावर देखील तरुणी शिक्षण घेत होती. तरुणी अमरावती येथे बीएस.सी.चे शिक्षण घेत असल्याने ११ फेब्रुवारीपासून तिची परीक्षा होती. त्यामुळे ती अमरावती येथे राहण्यासाठी गेली होती. दरम्यानच्या काळात त्या तरुणाची पत्नीच्या मामे बहिणीसोबत ओळख झाली. सख्खी मामेबहीण असल्याने तिचे घरी नेहमीच येणे-जाणे होते. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. तरुणाने पहिल्या पत्नीच्या मामे बहिणीशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर पहिल्या पत्नीला पतीने ‘व्हिडिओ कॉल’ करून दुसऱ्या लग्नाची माहिती दिली आणि परत येऊ नको,’ असे देखील फोनवरच बजावले. त्यामुळे पहिली पत्नी प्रचंड संतापली. तिने तातडीने अमरावतीवरून अकोला शहर गाठले. पतीविरोधात तक्रार देण्यासाठी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्याच ठिकाणी पती व त्याची दुसरी पत्नी देखील पोहोचली पती व पहिल्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यातच संतापाच्या भरात पत्नीने पतीला चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून पहिल्या पत्नीला शांत केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.