पोलीस दलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला १६ लाखांनी गंडवल्याच्या धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आरोपीने चक्क पोलीस मुख्यालयाच्या परिसरात तरुणाला पोलीस गणवेश व एका माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असलेले बनावट नियुक्तीपत्रदेखील दिले होते. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या अंत्री मलकापूर गावातील निशांत बाळकृष्ण पारस्कर याला मनोज श्रीकृष्ण तिवाने (३२, रा. अंत्री मलकापूर, ता. बाळापूर) या व्यक्तीने पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी १६ लाख रुपयांची मागणी केली. निशांत याने दागिने विकून आणि मित्र नातेवाईकांकडून उसनवारी करून १६ लाख रुपये दिले. हा प्रकार ऑक्टोबर २०२० रोजी घडला होता. २६ ऑक्टोबर २०२१ ला अकोला शहरातील पोलीस मुख्यालयात निशांतला बोलावत त्याला पोलिसाचा गणवेश दिला.
हेही वाचा – नागपूर विभागातील ४६९ पैकी ३९१ वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार
हेही वाचा – नागपूर : लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पकडले
पुढे त्याला पुण्याला पाठवले अन् नियुक्तीपत्र व्हॉट्सॲपवर शेअर केले. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नावाचा आदेश होता. मात्र, त्यावर त्यांची स्वाक्षरी नव्हती. काही दिवस निशांत पुण्यात राहिला. त्याला पोलीस प्रशिक्षणासाठी तयार व्हायला सांगितले. मात्र, सहा महिने उलटूनही त्याला प्रशिक्षण देण्यात आले नाही. अखेर तो अकोल्यात परतला. पुन्हा त्याला पुण्यात बोलावले. सोळा-सतरा महिने पुण्यात ठेवून निशांतला फसवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निशांतने आपले गाव गाठून उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे.