लोकसत्ता टीम
नागपूर : तरुणीच्या प्रेमात ठार वेड्या झालेल्या प्रियकराने तिला ‘व्हिडिओ कॉल’ केला आणि त्याने आपले प्रेम व्यक्त करून लग्न करण्याची मागणी घातली. मात्र, तरुणीने लग्न करण्यासाठी सध्या तयार नसल्याचे सांगताच प्रियकराने ‘मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही,’ अशी धमकी दिली. प्रेयसीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व्हिडिओ कॉल सुरु असतानाच प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबियांच्या प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी दार तोडून आतमध्ये गेले असता तो गळफास लटकलेल्या स्थितीत आढळला. पलाश (२२) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना सोमवारच्या रात्री कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत झेंडा चौक, महादुला परिसरात घडली. एका उच्चशिक्षित युवकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा-निवृत असो वा सेवेत, सरकारी कर्मचाऱ्यांनो वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती हवी असेल तर …
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पलाश हा फोटोग्राफर होता. त्याला आई आणि एक लहान भाऊ आहे. छायाचित्रकार पलाशने एका तरुणीला हृदयात कैद केले होते. दोघांची सुरुवातीला मैत्री होती. नंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्याही भेटी-गाठी होत गेल्या. दोघांनीही भविष्यात लग्न करण्याचे स्वप्न बघितले. ती सध्या शिक्षण घेत असल्यामुळे लग्नास टाळाटाळ करीत होती. पलाशला लग्नाची खूप घाई होती. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद नव्हता. याच कारणावरून त्याची नाराजी असला तरी तिच्या शिवाय तो स्वस्थ राहू शकत नव्हता.
घटनेच्या दिवशी त्याने प्रेयसीसोबत चॅटींग केली आणि फोनही केला. तिचा व्यवस्थित प्रतिसाद मिळत नसल्याने तो अस्वस्थ झाला. व्हिडीओ कॉल करून आयुष्य संपवत असल्याचे तो म्हणाला. पण तिकडे प्रेयसीसुद्धा त्याच्याकडे बोलण्याकडे दुर्लक्ष करीत त्याची परिक्षा घेत असावी. तिच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळायला थोडा झाला. प्रेयसीचा अबोला आणि हट्ट बघून पलाश भावनिक झाला. त्याला प्रेयसीचे वागणे पटले नसावे. काही वेळातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर प्रेयसीने त्याला कॉल केला. ‘अरे कुठे गेलास?, बोल ना?. मात्र, तो पर्यंत उशिर झाला होता.’
आणखी वाचा-नागपुरात इतवारीत भीषण आग; तरूणी दगावली, दोघे जखमी
पलाश बोलत नसल्याचे पाहून प्रेयसी घाबरली. तिने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने पलाशच्या भावाला फोन करून माहिती दिली. त्याने घराकडे धाव घेत पलाशला दार उघडायला सांगितले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता पलाश खुर्चीवर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. दार तोडून आतमध्ये गेले. त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्रेयसीवर होऊ शकतो गुन्हा दाखल
पलाशला लग्न करायचे होते आणि प्रेयसी नकार देत होती. त्यामुळे तो खचला होता. त्याने प्रेयसीच्या नकारामुळे आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस तरुणी जबाबदार असल्याचे कुटुंबियांचे म्हणने आहे. कोराडी पोलिसांनी पलाशचा मोबाईल ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे. आता त्याच्या प्रेयसीला पोलीस ताब्यात घेणार असून तिच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.