नागपूर : ज्या तरुणीवर दोन वर्षांपासून जीवापाड प्रेम केले, त्याच तरुणीशी प्रेमविवाह ठरल्याने युवकाचा आनंद गगनात मावत नव्हता. महिन्याभरावर लग्नाचा मुहूर्त होता. घरात लग्नाची तयारी सुरु होती. रात्रीला प्रेयसीसोबत जेवायला जाऊन रात्री उशिरा घरी आला. घरी आल्यानंतर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना वाडी परिसरात उघडकीस आली. प्रज्योत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्योत हा आईवडिलांना एकुलता मुलगा. त्याचे वडिल ऑटो चालवतात तर आई हातमजुरी करते. उच्चशिक्षित प्रज्योत हा एका भूखंड खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी करीत होता. त्याचे दोन वर्षांपूर्वी संजना (काल्पनिक नाव) या युवतीशी मैत्री झाली. काही दिवसांतच दोघांची मैत्री वाढली. आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. उच्चशिक्षित संजना आणि प्रज्योतचे दोन वर्षे प्रेमप्रकरण सुरु होते. प्रज्योतने संजनाला लग्न करण्याचा तगादा लावला. तिने काही दिवस कुटुंबियांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. काही महिने गेल्यानंतर पुन्हा प्रज्योतने तिला लग्नाबाबत विचारणा केली. त्यामुळे तिने आईवडिलांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी लग्नास विरोध दर्शविला. मात्र, दोघांनी मिळून प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी गेल्या महिन्यांत विवाह करण्यासाठी नोंदणी केली. येत्या १७ मार्चला दोघांचा प्रेमविवाह ठरला होता. प्रज्योतच्या आईने होणाऱ्या सुनेसाठी मंगळसूत्र, अंगठी आणि लग्नाचे कपडेसुद्धा घेतले होते. घरात लग्नाचे वातावरण आणि खरेदी सुरु होती. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.
वाढदिवसालाच केली आत्महत्या
प्रज्योतचा रविवारला (९ मार्च) वाढदिवस होता. तो शनिवारी सायंकाळी घरी आला. तेवढ्यात संजनाचा फोन आला. त्यामुळे तो प्रेयसीला भेटायला निघून गेला. दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. दोघांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तो रात्री उशिरा घरी आला. त्याने घरात जाऊन रविवारी पहाटेच्या सुमारास ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी आई झोपेतून उठली आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्याच्या खोलीत गेली. मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत बघताच तिने हंबरडा फोडला. पती व मुलगी धावतचा प्रज्योतच्या खोलीत आले. दोघेही धाय मोकलून रडायला लागले. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रज्योतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी दिली.