नागपूर : राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली आहे. वर्धा मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींना बघून एका युवकाने कानाला मोबाईल लावून अश्लील कृत्य केले. स्वत:ची पँट काढून तरुणींकडे बघून अश्लील इशारे केले. हा किळसवाणा प्रकार रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्यासुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती कारागृहासमोरील रस्त्यावर घडला.
या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्या विकृत मानसिकतेच्या युवकाला अटक अटक केली. वर्धा मार्गावरील अजनी चौकाकडून रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला आहे. सायंकाळच्या सुमारास फुटपाथवर तरुण-तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास काही तरुणी फुटपाथवर लावलेल्या बेंचवर बसल्या होत्या. अचानक एक युवक त्या तरुणींसमोर आला. त्याने तरुणींनी बघून अश्लील इशारे केले. त्यानंतर त्याने पँट खाली करुन अश्लील कृत्य करायला सुरुवात केली.
या प्रकारामुळे तरुणींना धक्काच बसला. त्याने तरुणींकडे पाहत चुंबन घेण्याचा इशाराही केला. सुरुवातीला त्या तरुणींनी दुर्लक्ष केले. मात्र, एकीने हिंमत दाखवत त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्या युवकाला हटकले. मात्र, तो युवक अरेरावी करुन तरुणींना दमदाटी करीस अश्लील संवाद साधत होता. त्यामुळे मुलींनी पोलिसांना फोन लावण्यासाठी काही व्यक्तींची मदत घेतली. काही नागरिक मदतीसाठी आल्यामुळे त्या युवकाने तेथून पलायन केले. धंतोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाजवळच नागपूर मध्यवर्ती कारागृहदेखील असून या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. तसेच वर्धा रोडवर मध्यरात्रीपर्यंत नेहमी वर्दळ असते. तरीही असा प्रकार घडल्यामुळे पोलिसांच्या गस्तप्रणालीवर संशय निर्माण केल्या जात आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मध्यवर्ती कारागृहासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ त्या तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा प्रकार बघून सोशल मिडियावर त्या युवकाविरुद्ध कमेंट्सचा पाऊस पडला आहे. धंतोली पोलिसांनी लगेच गांभीर्य दाखवून गुन्हा दाखल केला. रात्रभर त्या युवकाचा शोध घेतला. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या युवकाला धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी बारा वाजता धंतोली पोलीस ठाण्यात त्या युवकाला आणण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातही असाच प्रकार समोर आला होता. गौरव अग्रवाल या युवकाने महागड्या कारमधून उतरुन रस्त्यावरच लघूशंका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, हे विशेष.