अमरावती : एका तरुणाची गळा व हातावर चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी मार्गावरील रामगिरी महाराज मंदिराजवळ उघडकीस आली.
या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोशन महेंद्रसिंग नाईक (३६) रा. कृष्णानगर, तपोवन असे मृताचे नाव आहे. अंजनगाव बारी मार्गावरील रामगिरी महाराज मंदिराजवळील मोकळ्या जागेत एक तरुण मृतावस्थेत पडून असल्याचे बुधवारी सकाळी परिसरातील नागरिकांना दिसून आले.
नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच बडनेराचे ठाणेदार सुनील चव्हाण यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील, साहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर व गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान मृताच्या गळ्यावर व हातावर चाकूचे वार दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
मृताच्या हातावर रोशन हे नाव गोंदलेले होते. मात्र, त्याची ओळख पटली नव्हती. त्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी बडनेरा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सर्वप्रथम मृताची ओळख पटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यात काही तासांतच त्यांना यश आले. मृत तरुण हा रोशन नाईक असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी तपासाला वेग दिला. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या वादातून गेल्या १४ एप्रिल रोजी एका तरुणाची चाकूने हल्ला चढवून हत्या करण्यात आली होती. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील रविनगर परिसरातील इंद्रपुरी शाळेजवळ घडली होती. घटनेनंतर काही तासांतच तीनही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी तीर्थ गजानन वानखडे (२४) रा. रविनगर याची हत्या केली होती. रोशन विनोद पिंजरकर (३७), चेतन विनोद पिंजरकर (३२) दोघेही रा. पटवीपुरा व सूरज वसंत बघेकर (३६) रा. अंबाविहार या आरोपींना लगेच अटक करण्यात आली होती. या घटनेला आठ दिवस उलटत नाहीत, तोच आणखी एका तरूणाच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांसमोर मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान आहे.