लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अचानक प्रेयसीच्या जीवनात दुसरा युवक आला. त्यामुळे तिने प्रियकराशी अबोला धरला. लाडक्या प्रेयसीच्या अबोल्याने अस्वस्थ झालेल्या प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसी काम करीत असलेल्या दुकानाला थेट आग लावून टाकली. आगेत संपूर्ण दुकान जळून राख झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेल्सगर्ल तरुणीचा प्रियकर दिसला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. प्रकाश रमेश चट्टे (रा. आजरी-माजरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दुकान मालक रितेश सुदामा मकिजा रा. वर्धमाननगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
मकिजा यांचे बोहरा मशीद गल्लीत स्टेशनरीचे दुकान आहे. ३० एप्रिलच्या रात्री रितेश दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या दुकानाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने रितेश यांना फोन करून दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. रितेश तत्काळ दुकानात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांसह अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. संपूर्ण दुकान जळून राख झाले होते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला.
आणखी वाचा-रेल्वेच्या सीटखालील तीन पिशव्या उघडताच सापडले दारूचे घबाड…
तपासादरम्यान पोलिसांना एका संशयित तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुकानाच्या शटरमधून ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसत होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकाशला अटक केली. चौकशीत त्याने रितेश यांच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर त्याचे प्रेम असल्याचे सांगितले. दोघांचे संबंध चांगले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिची एका युवकाशी मैत्री झाली. त्यामुळे ती प्रकाशकडे दुर्लक्ष करीत होती. त्याच्याशी अबोला धरला होता. या रागातून त्याने प्रेयसी काम करत असलेल्या दुकानात आग लावल्याचे सांगितले.