अकोला: एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिने एका बाळाला जन्म देखील दिला. मात्र, प्रकृती नाजूक असल्यामुळे ते बाळ दगावले. नराधम युवकाने घुमजाव करून लग्नाला नकार दिला. अखेर पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी एका युवकाविरोधात अकोट फैल पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शुभम कैलाश खवले नामक युवकांने लग्नाचे आमिष देत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकाराची माहिती मुलीच्या कुटुंबियांना कळतात त्यांना मोठा धक्का बसला. मुलीच्या कुटुंबियांनी शुभमला जाब विचारला असता, त्याने ‘तुमच्या मुलीवर प्रेम असून लग्न करणार आहे,’ सांगितले. या प्रकरणात पीडितेला गर्भधारणा झाली. तिने २१ एप्रिल २०२५ रोजी एका गावातील नातेवाइकाकडे मुलाला जन्म दिला.

बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पीडित मुलीने अकोट फाईल पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम तरुणा विरोधात तक्रार दाखल केली. आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीचे १५ जून २०२३ पासून शारीरिक शोषण करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण व फसवणूक केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी आरोपी शुभम खवले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.