लोकसत्ता टीम
अमरावती : एकतर्फी प्रेमातून एक तरुण हा चक्क विषाची बाटली घेऊन एका तरुणीच्या घरी पोहोचला. माझ्यासोबत लग्न नाही केले, तर तुला व तुझ्या घरच्यांना जिवाने मारुन टाकेल आणि मी आत्महत्या करेल, अशी धमकी त्याने तिला दिली. ही धक्कादायक घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय घाडगे रा. वाशीम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही सन २०१५ पासून येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी अक्षय हासुद्धा तिच्या वर्गात होता. दोघे एका वर्गामध्ये असल्याने त्यांच्यात मैत्रीचे नाते होते. अक्षयसोबत लग्न करण्याचा तरुणीचा कोणताही विचार नव्हता. मात्र, अक्षय हा तिला लग्नाबाबत विचारणा करीत होता.
आणखी वाचा-साधू संत येती घरा… गजानन महाराजांची पालखी आज विदर्भात; पहिला मुक्काम जिजाऊंच्या माहेरी…
दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न अन्य एका तरुणाशी पक्के केले. तरुणीचे त्याच्यासोबत साक्षगंध झाल्याचे अक्षयला कळले. त्यावर माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करेन, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर अक्षयने तरुणीच्या नियोजित वराचा संपर्क क्रमांक मिळवून तिचे काही फोटो त्याला पाठविले. त्याने त्याला तिच्याबद्दल वाइट सांगून बदनामी केली. त्यामुळे तिचे लग्न मोडले.
दरम्यान, अक्षय हा चक्क विषाची बाटली घेऊन तिच्या घरी गेला. माझ्यासोबत लग्न नाही केले, तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवाने मारून टाकेल आणि मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने बडनेरा ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
© The Indian Express (P) Ltd