कुख्यात गुंड जेरबंद असण्याचा लाभ
शहरातील तरुणांमध्ये ‘भाईगिरी’चे आकर्षण निर्माण होत आहे. झोपडपट्टी आणि मध्यमवर्ग वसाहतींमध्ये अनेक तरुणांना ‘डॉन’ आणि कुख्यात ‘भाई’ आदर्श वाटू लागले आहेत. त्यामुळे कुख्यात गुंडांच्या टोळ्यांमध्ये नवीन तरुणांची भरती मोठय़ा प्रमाणात होत आहे. आज कुख्यात गुंड जेरबंद असल्याने अशा नवीन गुंडांचे चांगलेच फावले आहे. हे गुंड भाईच्या रुबाबात शहरभर वावरत असून शस्त्रांच्या धाकावर खंडणी वसूल करीत असल्याचे धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस येत आहेत.
मागील पाच ते सहा महिन्यांत नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध मोहीम हाती घेतली असून संतोष आंबेकर, राजू भद्रे, गोल्डी भुल्लर, युवराज माथनकर, फिरोज अशा टोळीप्रमुखांसह त्यांच्या खास नंबरकाऱ्यांना जेरबंद केले. या गुंडांच्या टोळयांवर ‘मोक्का’ लावल्याने ते किमान सहा महिने कारागृहात असतील, यात शंका नाही. या काळात शहरातील गुन्हेगारीत नवीन गुंडांचा उदय होऊ लागला आहे. अनेकजण दिवसाढवळया आणि चाकूच्या धाकावर व्यापारी, छोटे-मोठे उद्योजकांकडून खंडणी वसूल करीत असल्याचे दिसते.
तहसील आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात उघडकीस आलेल्या प्रकारातून हे स्पष्ट होते. राजेशकुमार आचारदास केवलरामाणी (३०, रा. भागाबाई ले-आऊट) यांचे इतवारीत दुकान आहे. काल सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता कृष्णा उर्फ गोलू सुरेश बोकडे (२३) आणि याच वयोगटातील त्याचे दोन साथीदारांनी चाकूच्या धाकावर ३ हजारांची खंडणी मागितली. तर दुसऱ्या घटनेत बिडीपेठ येथील रहिवासी महेश सेवकराव घोंगे (३८) यांच्या घरात सोमवारी दुपारी २.३० वाजता वस्तीतील तीन कुख्यात गुंड शिरले. पोलिसांत तक्रार दिली म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली आणि शस्त्राच्या धाकावर २० हजारांची मागणी केली.
नवीन उघडलेल्या दुकानात शिरून चाकूच्या धाकावर हप्ता वसुली करण्याचा प्रकार तहसील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात उघडकीस आला. सोमेश रघुबक्षी जांभा (१९,रा. गुरुनानक सोसायटी, केकेनगर) यांचे गांजाखेत येथील नारायण मार्केटमध्ये दुकान आहे. हे दुकान नव्याने सुरू झाले. त्यामुळे गुंजन उर्फ चिटय़ा विश्वजित हुमणे (२२, रा. हंसापुरी, जोतीनगर) हा काल संध्याकाळी ७ वाजता दुकानात आला आणि नवीन दुकान सुरू झाले असून २ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. सोमेश याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने सोमेश यांचे वडील रघुबक्षी यांना चाकूचा धाक दाखवून दीड हजार रुपये खंडणी मागितली. त्यानंतर दुकानाबाहेर थांबलेल्या दुसऱ्या साथीदारासह तो निघून गेला. या सर्व घटनांमध्ये आरोपी हे अतिशय कमी वयाचे आहेत. त्यामुळे तरुणाईच्या भविष्यावर चिंता करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
खंडणीसाठी खूनही झाला
हप्ता वसुलीला विरोध करणाऱ्या युवकाचा खून केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील तांडापेठ परिसरात सोमवारी मध्यरात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. संजय शामराव खापेकर (३४, रा. तांडापेठ, जुनीवस्ती) असे मृताचे नाव आहे. यातील आरोपी राधे हा शुभम उर्फ भुऱ्या विनायक बोणेकर (१९, रा. तांडापेठ) आणि इतर हे १८ ते २० वयोगटातील आहेत.
विचार करण्यासारखी बाब
प्रत्येक घटनेचा वेगवेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगारांचा पूर्वेतिहास आणि गुन्ह्य़ातील सत्य तपासून पाहावे लागेल. परंतु पूर्वेतिहास असणारे तरुण गुंड खंडणीतून मिळणाऱ्या पैशाला प्राधान्य देत असतील, तर विचार करण्याची बाब आहे. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील.
– रंजनकुमार शर्मा, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (गुन्हे)