नागपूर : तरुण संशोधकांना निसर्ग म्हणजे फक्त अनुभवायचा नसतो, तर त्या निसर्गातील नाविन्यही शोधून काढायचे असते. महाराष्ट्रातील तरुण सध्या हेच काम करत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या निसर्गातील मुशाफिरीत अनेक पालींच्या, सापाच्या नवनव्या प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. आताही त्यांनी उत्तर केरळच्या किनारी जंगलातून जमिनीवर राहणाऱ्या पालीची ‘चेंगोड्युमॅलेन्सिस’ ही छोटी, निशाचर प्रजाती शोधून काढली आहे.
ही छोटीशी पाल जमिनीवर पानांचा कचरा आणि जंगलातील खडकांमध्ये आढळते. फळबागा आणि छत आच्छादन असलेल्या इतर भागांसारख्या अंशतः मानवी बदललेल्या लँडस्केपमध्ये आढळते. ‘चेंगोड्युमाला’ किंवा ‘कोस्टल केरळ गेकोएला’ या पाली उत्तर केरळमधील कमी टेकड्या आणि किनारी जंगलात स्थानिक आहे.
हेही वाचा – अकोला : मुलगी झाली म्हणून छळ; आईने संपविले जीवन, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा
‘चेंगोड्युमाला’ ही कालिकत जिल्ह्यातील एक मध्यभागी टेकडी आहे. ‘चेंगोड्युमाला’ येथून वर्णन करण्यात आलेली पालीची दुसरी नवीन प्रजाती ही वस्तुस्थिती अधोरेखित करते की या कमी-उंचीच्या टेकड्यांमधील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात नाही आणि अजून अनेक प्रजाती शोधणे बाकी आहे.
ही टेकडी आणि उत्तर केरळमधील इतर किनारपट्टीवरील टेकड्या बेकायदेशीर खाणकाम आणि अंदाधुंद वृक्षतोडीमुळे प्रचंड दबावाखाली आहेत आणि स्थानिक जैवविविधतेला आधार देणाऱ्या या अनोख्या अधिवासांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
‘सोसायटी फॉर द स्टडी ऑफ एम्फिबियन्स अॅण्ड रेप्टाइल्स’, यूएसएचे आंतरराष्ट्रीय प्रकाशन ‘जर्नल ऑफ हर्पेटोलॉजी’मध्ये गुरुवारी या नवीन प्रजातींचे वर्णन करणारा पेपर प्रकाशित झाला. ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन, मुंबईचे इशान अग्रवाल आणि अक्षय खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथक होते. त्यात सेंट जोसेफ कॉलेज आणि केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, केरळमधील उमेश पावकुंडी आणि संदीप दास आणि विलानोव्हा युनिव्हर्सिटी, यूएसएमधील ॲरॉन एम. बाऊर यांचा समावेश होता.