नागपूर : विवाहित असलेल्या युवकाचा एका तरुणीवर जीव जडला. दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. प्रेयसीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर प्रेयसीने नोकरी लावून देण्याची गळ घातली. प्रियकराने नकार देताच पोलिसांत बाळासह जाऊन बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उमेश भगते (नरखेड) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश भगते हा नागपुरात एसी दुरुस्तीचे काम करतो. तो विवाहित असून त्याला पत्नी व मुलगा आहे. त्याचे गावात राहणाऱ्या स्विटी (काल्पनिक नाव) या युवतीशी सूत जुळले. विवाहित असलेला उमेश हा स्विटीशी मोबाईलवरून चॅटिंग करीत होता. दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. उमेशने तिला प्रेमाची मागणी घातली. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. जवळपास चार महिन्यांपर्यंत ही बाब तिने कुटुंबियांकडून लपवून ठेवली. गर्भपात करण्याचा दोघांनीही प्रयत्न केला. मात्र, वेळ निघून गेल्याचे सांगून गर्भपातही होऊ शकला नाही. बाळाला जन्म देण्यावाचून स्विटीकडे पर्याय नव्हता. शेवटी तिने आपल्या आईला गर्भवती असल्याची बाब सांगितली. त्यांनी प्रियकराचे नाव विचारले असता ती कुणाचेच नाव सांगत नव्हती. त्यामुळे आईसुद्धा अडचणीत आली. त्यानंतर हळूहळू उमेशच्या घरी भेटी वाढत होत्या.
हेही वाचा: नागपूर: गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात पर्यटक बसला अपघात
दोघांच्याही नावाची गावात चर्चा होऊ लागली. दोघांचेही प्रेमसंबंध उघडकीस आले. त्यामुळे स्विटीने आईला उमेशचा पराक्रम सांगितला. दुसरीकडे उमेशच्या पत्नीलाही पतीच्या अनैतिक संबंधच नव्हे तर प्रेयसी गर्भवती असल्याची माहिती झाली. त्यामुळे तिनेही माहेरी जाण्याचा पवित्रा घेतला. अडचणीत असलेल्या उमेशने स्विटीपासून दुरावा निर्माण केला. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात स्विटीने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे गावात आणखी बदनामी झाली.
उमेशने दिलेल्या सूचनेनुसार स्विटीने १०९८ क्रमांकावर फोन केला. बाळाचे संगोपन करण्यास सक्षम नसल्याची माहिती देऊन नवजात बाळ चाईल्ड लाईनला सोपवले. त्या बाळाची अमरावतीच्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. त्यानंतरही उमेशने गावातील बदनामी आणि भीतीपोटी गावातून पळ काढला. स्विटीने त्याला कुठेतरी नोकरीवर लावून देण्यासाठी दबाव टाकला. त्याने नकार दिल्यामुळे स्विटीने नरखेड पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.