नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात नागपूरकर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र, त्यातही महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून सर्वाधिक वेळा वाहतुकीचे नियम तोडण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाच्या कारवाईतून समोर आली आहे.

शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. अनेक चालकांना वाहन चालवण्याचा पुरेसा अनुभव किंवा सराव नसतो. अतिआत्मविश्वास दाखवून वाहन चालवले जातात. तसेच अनेक वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात काहीच वावगे वाटत नाही. सिग्नलचे उल्लंघन, ट्रिपल सीट, कानाला फोन लावून वाहन चालवणे आणि वाहन चालवण्याचा परवाना नसणे, हेल्मेट नसणे अशा नियमभंगात महिला, तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी पुढे आहेत. अनेक चौकातील सीसीटीव्ही फुटेजवरूनही हे स्पष्ट झाले आहे. अनेकदा शाळकरी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थिनी बघून वाहतूक पोलिसांकडून सहानुभूती दाखवली जाते. त्यामुळे कारवाईचा आकडा कमी आहे, असा दावा वाहतूक पोलीस करतात. सोनेगाव ते सीताबर्डी, जननाडे चौक, सक्करदरा चौक, नंदनवन चौक, अशोक चौक, सेंट्रल ॲव्हेन्यू, कॉटन मार्केट चौक, व्हेरायटी चौक, इंदोरा चौक, पाचपावली रोड, लकडगंज रोड, कोतवाली-महाल रोड तसेच सीताबर्डी ते रविनगरकडे जाणारा मार्ग, तुकडोजी पुतळा ते क्रीडा चौक यादरम्यान महिला, तरुणी आणि शाळकरी मुली वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत.

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी एक महिला करणार पुरुष तुकडीचे नेतृत्व; वर्धेच्या सुनेने रचला इतिहास

दुचाकी चालवतात, पण परवाना नाही

शहरातील जवळपास ३५ टक्के वाहनांची परिवहन विभागात महिलांच्या नावे नोंद आहे. मात्र, त्या तुलनेत महिलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण न घेता महिला थेट रस्त्यावर दुचाकी चालवतात. परवानाधारक महिलांची संख्या शहरात अत्यल्प आहे. अपघातांची वाढती संख्या बघता वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे.

कारवाईत वाढ पण सुधारणा नाही

२०२३ मध्ये ६२ हजार ३५१ जणांवर सिग्नल तोडल्याची तर २५ हजार ३२० जणांवर ट्रिपल सीट वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. कानाला मोबाईल लावून वाहन चालवणाऱ्या ६४८२ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यातही तरुणींचा टक्का जास्त आहे.

हेही वाचा – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार चाकूने हत्या, चंद्रपूर शहरात तणावाचे वातावरण

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पुरुष किंवा महिला असा भेद केला जात नाही. थेट कारवाई करण्यात येते. सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. परवाना नसणे, हेल्मेट न वापरणे अशा कारवाईमध्ये महिलांचा टक्का पूर्वीपेक्षा वाढला आहे. – विनोद चौधरी, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.