करोनाचा फटका : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची आकडेवारी

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता 

नागपूर : करिअरच्या दृष्टीने वयाचा १८ ते ३० वर्षांचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. मात्र, रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने या वयोगटातील तरुण मोठय़ा संख्येने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे (मनरेगा) वळत असल्याचे चित्र देशात आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांत मनरेगाच्या कामावरील १८ ते ३० वयोगटातील मजुरांची संख्या ५६.७५ लाखांवरून १ कोटी १ लाख  १८ हजारांवर गेली आह़े  विशेष म्हणजे, करोनाकाळात (२०२०-२१)  एकाच वर्षांत या संख्येत दुपटीने वाढ झाली. २०१८-१९ मध्ये तरुण मजुरांची संख्या ५६.७५ लाख होती. २०१९-२० मध्ये ५६.२४ लाख होती, पण २०२०-२१ या वर्षांत (करोनाकाळ) यात दुपटीने वाढ होऊन ती एक कोटीहून अधिक झाली. ही संख्या प्रत्यक्ष कामावर गेलेल्या मजुरांची असून, नोंदणी केलेल्यांची संख्या याहून अधिक आहे.

 देशात २०१९-२० पर्यंत १८ ते ३० या वयोगटातील २.७५ कोटी लोकांनी नोंदणी केली होती. २०२०-२१ या वर्षांपर्यंत ही संख्या वाढून २.९४ कोटींपर्यंत गेली होती. यासंदर्भात महाराष्ट्रातील मनरेगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी २०२०-२१ या करोनाकाळात टाळेबंदीदरम्यान अनेकांचे रोजगार गेल्याने हा वर्ग मनरेगाच्या कामाकडे वळल्याचे सांगितले.

मनरेगा ही मागणीवर आधारित रोजगार उपलब्ध करून देणारी योजना आहे. महाराष्ट्रात २०२० आणि २०२१ या वर्षांत रोजगाराची मागणी करणाऱ्या सर्वच वयोगटातील कुटुंबांना सरासरी ४०.९६ दिवस व ४०.३४ दिवस काम देण्यात आले, असे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

१८ ते ३० वयोगटातील मजुरांची संख्या

वर्ष     संख्या (लाखांत) 

२०१८-१९             ५६.७५ 

२०१९-२०             ५६.२४ 

२०२०-२१             १०१.१८

Story img Loader