नागपूर : युवकांमधील व्यसनाधिनता व वाढती गुन्हेगारी याचा परस्परसंबंध असून या भयावह परिस्थितीत तरुणांनी शिक्षण, रोजगार आणि स्वविकासाला प्राधान्य देत कोणत्याही व्यसनाला बळी पडू नये. तरुणांनो प्रेम करा, पण प्रेमात निर्व्यसनीच जोडीदार निवडा असे कळकळीचे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी केले.
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर, नेहरू युवा केंद्र आणि जनमानस बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘नशीली दवाईयो की लत और मादक द्रव्य का सेवन- युवा जागरूकता कार्यक्रम’ या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जिल्हा बाल रक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांनी ‘मुलांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, अन्यथा त्यांचा विस्फोट होऊन ते व्यसनाधीनतेकडे वळतात’ असे महत्वाचे विचार अधोरेखित करीत युवकांना व्यसनाधीनतेपासून दुर राहण्याचे आवाहन केले. यावेळी मेयोचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सावजी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, कोराडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रघुनाथ कडके हे प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांची पी. एफ.ची रक्कम थकली… महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
सदर कार्यक्रमात डॉ. अशोक बागुल यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्याला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सांगितल्या. तणाव व्यवस्थापनासाठी व्यायाम, संगीत हे अत्यंत परिणामकारक साधने आहेत असेही सांगितले.
डॉ. सावजी यांनी देखील व्यसनाधीन व्यक्तीला जर डिप्रेशनमधून बाहेर काढायचे असेल तर त्याला प्रेम, ममता व माणूसकीने त्याच्याबरोबर व्यवहार केला तरच तो त्यातून बाहेर पडू शकतो असे व्यक्तव्य केले. मुस्ताक पठाण यांनी मानव तस्करी या विषयावर सखोल प्रकाश टाकून समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून आपली काय भूमिका असावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा – प्रवाशांनी कृपया लक्षात घ्यावे… नॉन-इंटरलॉकिंगमुळे या गाड्या गुरुवारपासून रद्द
याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नशा बंदी मंडळाचे जिल्हा संघटक गौरव आळणे यांनी नशामुक्त भारतअंतर्गत दीडशे विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीची सामूहिकरीत्या शपथ घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, प्राचार्य, ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय, नागपूर यांनी गुन्हेगारी व व्यसनाधीनता याची भयानक परिस्थितीची जाण करून देत युवा पिढी कशी भरकटत चालली आहे याची वास्तविकता विद्यार्थ्यांपुढे मांडली.