नागपूर : घरी कुणी नसताना एका युवकाच्या आईचा प्रियकर भेटायला आला. आई व तिच्या प्रियकरात शाब्दिक वाद झाला. तेवढ्यात मुलगा घरी आला. त्याने आईच्या प्रियकराची यथेच्छ धुलाई केली. लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचे डोके फोडले. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणास अटक केली आहे. निक्की (२०) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. जखमी एकनाथ (४२) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आरोपी निक्की आणि एकनाथ एकाच वस्तीत राहतात. एकनाथ ई-रिक्शा चालवतो आणि उंटखाना परिसरातील एका खासगी कंपनीत टीम लीडर म्हणून काम करतो. त्याला एक मुलगीही आहे. त्याच्याच कार्यालयात निक्कीची आई (वय ४०) ही सुद्धा काम करते. निक्कीच्या वडिलांचे ९ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा एकनाथने त्याच्या आईला सहारा दिला. ५ वर्षांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

हेही वाचा…उच्च शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा राज्याचा निर्धार, गुणवत्ता सेलमध्ये ‘या’ मान्यवरांची झाली नियुक्ती

दोन महिन्यांपूर्वी एकनाथ आणि महिलेत वाद झाला. तिने एकनाथशी बोलचाल बंद केली आणि त्याचा फोन नंबरही ‘ब्लॉक’ केला होता. तेव्हापासून तिने काम ही सोडले होते. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एकनाथ महिलेच्या घरी आला. बोलचाल बंद करणे आणि नोकरी सोडण्यामागील कारण विचारले. तसेच संबंध ठेवण्यासाठी बाध्य केले. महिलेने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला आणि घरी जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद आणि शिविगाळ सुरू झाली. याच दरम्यान निक्की घरी आला. आईशी वाद होत असल्याचे पाहून तो संतापला.

हेही वाचा…रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

खोलीतून लोखंडी रॉड आणत एकनाथच्या डोक्यावर प्रहार केला. एकनाथच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. तो वाठोडा ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती केले. त्याचा जबाब नोंदवून निक्की विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून अटक केली.

Story img Loader