लोकसत्ता टीम
अमरावती: मुलगा आणि मुलगी दोघेही अमरावतीतच राहणारे. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले. धडाक्यात त्यांचा साखरपुडाही झाला. पण, मुलाने लगेच कारच्या नोंदणीसाठी एक लाख रुपये मागितले. मुलीच्या वडिलाने भविष्याचा विचार करून ती रक्कम मुलाला दिली, पण तो समाधानी नव्हता. त्याने कारच्या खरेदीसाठी चक्क पंधरा लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या वडिलांनी त्याबाबत असमर्थता दर्शवताच मुलाने लग्न मोडले आणि जिवे मारण्याची धमकी मुलीला दिली. या प्रकरणी मुलासह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विवेक सिद्धार्थ नागदिवे, सिद्धार्थ देवराव नागदिवे आणि एक महिला (तिघेही रा. मनकर्णा नगर, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार दोघांचा साखरपुडा झाल्याबरोबर मुलाने कारच्या नोंदणीसाठी एक लाख रुपयांची मागणी केली, आपण मुलीच्या भवितव्याचा विचार करून लगेच ही रक्कम दिली. त्यानंतर गेल्या ७ मे रोजी मुलगी तिच्या भावासोबत एका मॉलमध्ये गेली, तेव्हा विवेक त्यांना भेटला. विवेकने मुलीकडे नवीन कार घेण्यासाठी १५ लाख रुपये मागितले. ही बाब मुलीने वडिलांना सांगितली.
एवढी मोठी रक्कम देण्यास वडील असमर्थ आहेत. ती देण्यास वडील तयार नाहीत, असे मुलीने विवेकला सांगितल्यानंतर तो संतापला. ‘मला जर रक्कम मिळाली नाही, तर मी लग्न करणार नाही आणि बळजबरीने लग्न केलेच, तर तुला जिवानिशी सोडणार नाही,’ अशी धमकीच विवेकने पीडित मुलीला दिली. त्यानंतर विवेकने मुलीच्या मोबाईलवर लग्न मोडल्याचा संदेशही पाठवला. मुलीच्या वडिलांनी कुटुंबीयांची बैठक घेतली. पुन्हा विवेकने कारची मागणी केली. लग्न मोडल्यामुळे मुलीच्या आयुष्यावर परिणाम झाल्याचे सांगून वडिलांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.