सासू-सासऱ्यांनी मारहाण केल्याने एका तरुणाने पोलिसांना फाेन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गावात घडली. हितेश बबनराव मोरे (२७), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा- वाशीम: ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा स्वपक्षीय महिला नेत्यावर चाकू हल्ला; जिल्हा प्रमुखास अटक
सिरसो येथील रहिवासी हितेश मोरे याचा पत्नीसोबत वाद झाला होता. त्यामुळे पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी गेली होती. पत्नीला व मुलांना घ्यायला तो अमरावती जिल्ह्यातील आसेगाव येथील सासरी गेला. यावेळी सासू-सासर्यांनी त्याच्या पत्नीला पाठविण्यास नकार देऊन हितेशला मारहाण केली. त्यामुळे दु:खी झालेल्या हितेशने घर गाठले. पोलीस मदत क्रमांकावर फोन केला. ‘मला सासू-सासऱ्याने मारहाण केली आहे, मी आत्महत्या करतोय’, असे हितेशने पोलिसांना सांगितले. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी हितेशच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हितेशने घरात गळफास घेत आपले जीवन संपवले होते. याप्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.