अमरावती : जन्‍मापासून मूकबधीर असलेल्‍या एका युवकाचा जगण्‍याचा संघर्ष सुरू होता. खाणाखुणांनी तो आपल्‍या भावना व्‍यक्‍त करीत होता. पण, त्‍याचा एक जवळचाच नातेवाईक त्‍याच्‍या अपंगत्‍वावरून चिडवत होता, त्रास देत होता. अखेर सततच्‍या त्रासाला कंटाळून एका दिवशी या मूकबधीर युवकाने टोकाचा निर्णय घेतला. गळफास घेऊन त्‍याने आत्‍महत्‍या केली. समरसपुरा पोलिसांनी या प्रकरणी तब्‍बल दोन वर्षांनंतर आरोपी नागोराव पंजाबराव भोरे (३७, रा. बळेगाव) विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

गोकूळ सुदाम भोरे (१९, रा. बळेगाव) असे मृताचे नाव आहे. जन्‍मत:च कर्णबधीर असलेला हा युवक अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला शिकत होता. याप्रकरणी, मृताचे वडील सुदाम भोरे यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपीने आपल्या मुलाला नेहमीच अपंगत्‍वावरून त्रास दिला. त्यामुळे गोकुळने आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, अशी फिर्याद मृताच्या पित्याने नोंदविली.

सरमसपुरा पोलिसांनी याप्रकरणी मृताचा मोबाइल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला चाचणीला पाठविले होता. तर काही युट्युब व्हिडीओचे भाषांतर देखील करण्यात आले. तो सर्व तांत्रिक तपास व फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

११ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास सुदाम भोरे हे बाहेरून घरी परत आले. त्यावेळी गोकुळ याला त्यांनी आवाज दिला. गोकुळने घराचा दरवाजा आतून बंद करून देवघरातील फॅनला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सन २०२० पासून फिर्यादी सुदाम भोरे यांचा चुलत भाऊ नागोराव भोरे हा गोकुळला त्याच्या दिव्यांगपणावरून इशारे करून त्रास देत होता. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी भोरे हे घरातील एका लग्न समारंभासाठी कुटुंबीयांसह हरम येथे गेले होते. तेथेदेखील आरोपीने गोकुळला त्रास दिल्याने तो रडत होता. त्यामुळे त्याने वडिलांना इशाऱ्यानेच घरी परत चालण्यास सांगितले.

गोकूळ हा त्‍या दिवशी फार दु:खी होता. सायंकाळी तो घरी परत आला. गोकूळ याने स्‍वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते. त्‍याने दार आतून बंद केले, फॅनला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. बराच वेळ झाला, तो दार उघडत नाही, हे पाहून जेव्‍हा त्‍याच्‍या कुटुंबीयांनी डोकावून पाहिले, तेव्‍हा त्‍यांना ते धक्‍कादायक दृश्‍य दिसले.

Story img Loader