चंद्रपूर: माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र तथा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे दर्शविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे राऊत यांनी तशी चाचपणी सुरू केली असून गेल्याच आठवड्यात चंद्रपूर शहरातील कॉग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चर्चा केली आहे. दरम्यान चंद्रपूर विधानसभेसाठी कॉग्रेसच्या यादीत दररोज नविन नावांची भर पडत आहे.

हे ही वाचा… ‘त्या’ अधिकाऱ्यांच्‍या घटनाबाह्य कारभाराकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष, माजी आमदार बी.टी. देशमुख म्हणतात,’पोरकटपणाचा हट्ट…’

येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदार संघात कॉग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतल्याने कॉग्रेसकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यातल्या त्यात चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे कॉग्रेस येथे सामाजिक्र व आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे. या यादीत सध्या पहिल्या क्रमांकावर प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांचे नाव आहे.

राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र कुणाल राऊत यांच्या हातात राज्याच्या युवक कॉग्रेसची सूत्रे आहेत. युवक कॉग्रेस अध्यक्ष या नात्याने कुणाल राऊत यांनी या जिल्ह्याचा दौरा देखील केला आहे. तसेच जिल्ह्यातील युवक कॉग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्कात देखील आहेत.विधानसभा निवडणुक अवघ्या तीन महिन्यांवर आली असतांना कुणाल राऊत यांनी समर्थकांच्या माध्यमातून चाचपणी देखील सुरू केली आहे. तसेच पक्ष श्रेष्ठींकडे चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे यांना विचारणा केली असता, कुणाल राऊत चंद्रपूर विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती दिली. राऊत यांच्या सोबतच चंद्रपूरातून निवडणुक लढण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये यापूर्वी दोन वेळा याच विधानसभेत निवडणुक लढलेले महेश मेंढे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अंभोरे, राजू झोडे, चंद्रपूर जिल्हा युवक कॉग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, डॉ.कांबळे, अनुताई दहेगांवकर यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उमेदवारी शेवटच्या क्षणी कुणाला मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा… अमरावती : ‘अलायन्स एअर’च्या विमान उड्डाणाची प्रतीक्षाच, १५ ऑगस्टपर्यंत…

विशेष म्हणजे २००९ मध्ये भाजपाने चंद्रपूर विधानसभेतून नागपूरचे रहिवासी असलेले नाना शामकुळे यांना संधी दिली होती. शामकुळे यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवर भाजपातून तीव्र विरोध झाला होता. मात्र या विरोधानंतरही २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुका शामकुळे यांनी सहज जिंकल्या. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत शामकुळे यांच्या विरोधात तीव्र नाराजी असल्याने अपक्ष किशोर जोरगेवार यांनी त्यांचा पराभव केला होता. सध्या जोरगेवार अपक्ष आमदार असले तरी निवडणुका जाहीर होत पर्यंत ते कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान कुणाल राऊत यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असली तरी स्थानिक पातळीवर कॉग्रेस नेते त्यांच्या उमेदवारीला विरोध करतील असेही चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth congress president and nitin raut son kunal raut eager to contest assembly election at chandrapur constituency rsj 74 asj
Show comments