लोकसत्ता टीम
नागपूर : राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंदू तिथीनुसार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले होते. यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला.
मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी युवक काँग्रेसच्या वतीने नागपूरच्या महाल येथील संघ मुख्यालयाच्या दिशेने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आणखी वाचा-विदर्भातील पालकमंत्री निवडीत भाजपचाच वरचष्मा
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली. युवक काँग्रेसचा मोर्चा संघ मुख्यालयाकडे जात असताना पोलिसांनी चिटणवीस पार्कच्या जवळ अडवला. आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.विशेष म्हणजे पोलिसांची परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी वाहतूक कोंडी झाली होती. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला.
यांना अटक करण्यात आली
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, अजीत सिंह, तौशिफ खान, डॉ. श्रीनिवास, आसिफ शेख, नयन तलवलकर, फजलुल कुरेशी, नीलेश खोबरागड़े, विशाल वाघमारे, लोकेश फुलझेले, पलाश लिंगायत, गौरव डोंगरे आदींना अटक करून गणेशपेठ पोलिसात नेण्यात आले.
आणखी वाचा-लग्नास नकार, आत्महत्येस कारण? शिक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय…
काय म्हणाले डॉ. मोहन भागवत?
इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना ‘राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार’ प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत बोलत होते. “राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली. देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही,” असे मोहन भागवत म्हणाले होते.