नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पाडण्यात अपयशी ठरल्याचे सांगत माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची सुपुत्री शिवानी वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र केतन ठाकरे आणि माजी आमदार अशोक धवड यांचे सुपुत्र अभिषेक धवड यांच्यासह ६० पदाधिकाऱ्यांना प्रदेश युवक काँग्रेसने पदमुक्त केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याविरुद्ध लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. त्यानंतर देशभरात वेगवेगळ्या शहरात भागवत यांच्याविरुद्ध आंदोलन केले जात आहे. प्रदेश युवक काँग्रेसने रविवारी नागपुरात आंदोलन केले आहे. त्यानंतर आज तब्बल ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा आणि सहप्रभारी कुमार रोहित यांनी यासंदर्भातील पत्र काढले आहे. त्यानुसार यासंदर्भातील संघटनेने दिलेले काम जबाबदारीपूर्वक करण्यात अपयशी ठरल्याने पदमुक्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव यांचा समावेश आहे. तसेच नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष, सावनेर, कामठी, काटोल, हिंगणा, उमरेड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षांचा समावेश आहे. अशाप्रकारे अचानक पदमुक्त करण्यात आल्याने युवक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पदमुक्त झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, सरिचटणीस शिवानी वडेट्टीवार, सरचिटणीस केतन ठाकरे, सचिव अक्षय हेटे यांच्या समावेश आहे.
राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे वक्तव्य भागवत यांनी केले होते. याविरोधात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली रविवारी महाल येथील संघ मुख्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. रविवारी महालच्या देवडीया काँग्रेस भवन येथून युवक काँग्रेसने आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलक संघ मुख्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना चिटणवीस पार्कजवळ अडवले. तसेच आंदोलन थांबवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आंदोलक आक्रमक झाल्याने पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी मोहन भागवत यांना अटक करण्याची आणि संघावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब सहभागी झाले. मात्र, शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, अभिषेक धवड, अभय हेटे तसेच अनेक पदाधिकारी सहभागी झाले नव्हते. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी प्रदेश युवक काँग्रेसने तब्बल ६० पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या जबाबदारी मुक्त केले आहे.