भंडारा: सध्या वाढदिवसाला काहीतरी वेगळे करण्याच्या नादात तरुण भलतेच धाडस करताना दिसत आहेत. त्यात बंदूक, तलवार , चाकू अशा शस्त्रानी केक कापून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याचे प्रकार हल्ली वाढत आहेत. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा गंभीर प्रकार भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा घडला आहे.

रोहा येथील एका तरुणाने त्याचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तब्बल अकरा केक तलवारीने कापण्यात आले. यापूर्वी घडलेल्या अशा प्रकरणामध्ये पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा… समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव कार सिमेंट रेलिंगला धडकली, दोन ठार

मोहाडी तालुक्यातील रोहा येथील कमलेश बांडेबुचे याचा काल दि. २८ मे रोजी वाढदिवस थाटात करण्याचे ठरवले. त्यासाठी तब्बल ११ केक आणले. त्यावर कमलेश सेठ असे लिहिले होते. हे अकरा केक एका रांगेत टेबलवर ठेवण्यात आले. त्यानंतर अतिषबाजी करण्यात आली आणि कमलेश याने चक्क तलवारीने हे केक कापले. उपस्थितांपैकी एकाने गंमत म्हणून त्याचा व्हिडीओ बनविला. मात्र या व्हिडिओ मुळे आता कमलेश अडचणीत येणार असून अशाप्रकारे तलवारीने केक कापणे त्याला महागात पडणार आहे. यापूर्वी सुध्दा अशाप्रकारे तलवारीने केक कापण्याचे प्रकार घडले असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही.