उपराजधानीत शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली, तर तिसऱ्या घटनेत एका टँकरमधून पाईपने पाणी रस्त्यावर टाकणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाचा चालकाच्या चुकीने धक्का लागून मृत्यू झाला आहे.
किशोर रमेश सांगोळे (२८) रा. सुगत नगर, बौद्ध विहाराच्या बाजूला, एल. आय. जी. क्वॉर्टर क्रमांक ६८, नारी रोड आणि उमेश अशोक गजभिये (३५) रा. चंद्रमणी नगर, आंबेडकर नगर, कंट्रोल वाडी अशी गळफास लावलेल्यांची नावे आहेत. जयंत सांगोळे हे घरातील पहिल्या माळ्यावर विजेचे काम करीत होते. याप्रसंगी किशोर सांगोळे हे नेहमी प्रमाणे आपल्या खोलीत झोपले होते. बराच वेळ झाल्यावरही किशोर उठला नसल्याने जयंतने किशोरच्या खोलीत डोकावले. किशोर हा छताच्या पंख्याला गळफास लावून लटकलेला दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दुसऱ्या घटनेत मृत्यू झालेल्या उमेश गजभिये यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
त्यांची पत्नी काही कारणास्तोवर ५ दिवसांपासून माहेरी गेली होती. शनिवारी जास्त मद्य प्राशन करून त्यांनी घराचे दार बंद केले. घराच्या लोखंडी हुकला दुपट्टा बांधून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
तिसरी घटना नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. रोहित हिरालाल यादव (२२) रा. गोबरिया, जि. शिवनी, मध्यप्रदेश हा टँकर क्रमांक एमएच- १२, डीटी ७०५२ मधील पाईप धरून रस्त्यावर पाणी टाकत होता. टँकर चालकाच्या दुर्लक्षाने त्याला टँकरची जोरदार धडक बसली. रक्ताच्या थारोडय़ात रोहित खाली पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी टँकरच्या चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.