जेवणाचा डबा तयार करण्यासाठी विवाहित महिलेला घरी नेऊन युवकाने बलात्कार केला. महिलेचे नग्न छायाचित्र काढून जवळपास एक लाख रुपये उकळले. छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत आणखी ६० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे युवकाने तिचे छायाचित्र नातेवाईकांना पाठवले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिहीर विश्वनाथ साना (गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित ३८ वर्षीय महिला आपल्या जाऊबाईच्या बाळावर उपचार घेण्यासाठी नागपुरात आली होती. मिहीर हा सध्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वकर्मानगर येथे राहतो. महिलेची मिहीरसोबत भेट झाली. १२ एप्रिलला जेवणाचा डबा करण्यासाठी मिहीर महिलेला घरी घेऊन गेला. त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. तिचे काही नग्न छायाचित्र काढले.
हेही वाचा >>> नागपूर: भाजप नेत्याचा खून करणाऱ्या दोघांना अटक; बोनस न दिल्यामुळे नोकरांनी गळा चिरला
गेल्या तीन महिन्यांपासून मिहीर त्या महिलेला पैशाची मागणी करीत होता. महिलेने आतापर्यंत त्याला एक लाख रुपये दिले. तरीही तो आणखी ६० हजार रुपये मागत होता. पैसे न दिल्यास छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत होता. त्याने काही छायाचित्र महिलेच्या नणंदेला आणि अन्य नातेवाईकांना पाठवले. तसेच अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले.
वारंवार लैंगिक अत्याचाराला कंटाळलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नोकराने केला मुलीचा विनयभंग
मालक घरात गेल्याचे बघून चक्कीवर काम करणाऱ्या ४० वर्षांच्या नोकराने एका मुलीचा विनयभंग केला. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. शंकर रामखिलावन वर्मा (४०, रा. इंदिरामाता नगर, एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका आटाचक्कीवर काम करतो. सोमवारी २९ वर्षीय महिलेची तिसऱ्या वर्गात शिकत असलेली नऊ वर्षांची मुलगी दळण न्यायला आटाचक्कीवर गेली. दळण झाल्यानंतर मुलीने आटाचक्कीच्या मालकाला ५० रुपयांची नोट दिली. त्यानंतर आटाचक्कीचा मालक सुटे पैसे आणण्यासाठी घरात गेले. तेवढय़ात चक्कीवर काम करणाऱ्या आरोपी शंकरने या मुलीला शेजारी असलेल्या गल्लीत नेऊन तिचा विनयभंग केला. घरी गेल्यानंतर या चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शंकरविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.