नागपूर : गोरेवाडा सफारी गेट जवळ एक युवक धावत्या ऑटोतून खाली पडला. त्याला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. घटनेनंतर दोन्ही वाहन चालक पळून गेले. या विचित्र अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ मे रोजी रात्री १२.३० ते १.३० दरम्यान ही घटना घडली.
हेही वाचा – नागपूर : धक्कादायक.. मोठा शस्त्रसाठा जप्त…
सचिन अशोक सलामे (२९) रा. आठवा मैल ग्रामपंचायतजवळ, वाडी असे मृत युवकाचे नाव आहे. तो कळमेश्वर येथून प्रवासी ऑटोत बसून घरी परत येत होता. गोरेवाडा सफारी गेटच्या ५० मीटर अंतरावर तो धावत्या ऑटोतून खाली पडला. तरीदेखील ऑटोचालकाने ऑटो न थांबविता तेथून पळून गेला. तेवढ्यात मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून सचिनच्या पायावरून नेऊन त्याला गंभीर दुखापत केली. मोपेड चालकही घटनास्थळावरून पसार झाला. सचिनला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सचिनची आई लक्ष्मीबाई अशोक सलामे (५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी ऑटोचालक व मोपेड चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.