भंडारा : उसणे पैसे परत दिले नसल्याच्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघडकीस आला. पोलिसांनी तत्परता दाखवत १२ तासांत दि. १४ मे रोजी रात्री ८ वाजता दोन अपरणकर्त्यांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रशांत वहाणे
व्यंकटेश नगर खात रोड असे अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रशांत वहाणे हे दि. १३ मे रोजी रात्री उशिरा पर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेही शोध न लागल्याने अखेर प्रशांत वहाणे यांची पत्नी दीपा वहाणे यांनी प्रशांत बेपत्ता झाल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात नोंदवली.
हेही वाचा – नागपूर: अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर चहाटपरी चालकाचा बलात्कार
भंडारा पोलिसांकडून शोध घेतला असता प्राप्त तांत्रिक पुराव्याच्या आधारे ४ ते ५ जणांनी प्रशांत यांचे अपहरण करून एका पांढऱ्या रंगाच्या एक्सयूव्ही ५०० वाहनामध्ये घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भंडारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी वसीम ऊर्फ मोसीन रहिम खान वय (२१) रा. खरबी गरीब नवाज चौक रेशिम बाग नागपूर, मंगेश तातोराव सावरकर (४१) रा. इतवारी मच्छीबाजार, जयभीम चौक नागपूर यांना वाहनासह पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
हेही वाचा – वर्धा : रेल्वेत नोकरीचे आमिष; बेरोजगार तरुणाची बारा लाखांनी फसवणूक
आरोपीच्या ताब्यातून प्रशांत वहाणे यांना सोडविण्यात आले आहे. उधारीच्या पैशाच्या कारणावरून अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात सुशांत पाटील, मंगेश, प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, बालाराम वरखडे, सुनिल राठोड, नरेंन्द्र झलके यांनी केली.