नागपूर : दंगलीला सुरुवात झाली तो क्षण हादरवणारा होता… एक मोठा जमाव संतापाच्या अग्नीत धगधगत हातात दगड घेऊन वस्तीकडे येत होता… माझे दुकानही याच वस्तीत… पुढे काय आक्रित घडेल, याचा अंदाज आला होता… पै-पै जमवून सुरू केलेले दुकान आता डोळ्यादेखत उद्ध्वस्त होणार, हे स्पष्ट दिसत होते… पण, त्याचवेळी दंगलखोरांचेच समाजबांधव पुढे आले व त्यांनी दगड मारणाऱ्या हातांना आवर घातला, अशा शब्दात बहुसंख्य समाजातील एका युवकाने दंगलीची ‘दुसरी बाजू’ सांगितली.
ज्या भागात दंगलीला सुरुवात झाली. तेथील एका युवक म्हणतो, मी आजही समोरच्या रस्त्यावर उभा राहून मदतीसाठी हाक दिली तर ४० अल्पसंख्याक आणि चार बहुसंख्य समाजातील लोक धावून येतील. हा युवक भालदारपुऱ्यातील. अगदी रस्त्याला लागून त्याचे दुकान. तो म्हणतो, मी संपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे. भालदारपुऱ्यातील लोकांनी वाचवले नाहीतर दंगल आणखी भडकली असती. मुळात दंगल करण्याचा त्या लोकांचा हेतू नव्हता. त्यांना केवळ निदर्शने करायची होती. त्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे निघाले. तेथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. चिटणवीसपुुरा चौकातही पोलिसांचा फौजफाटा होता. पण, जुन्या हिस्लॉप कॉलेज गल्लीत पोलीस नव्हते. त्यामुळे त्यांनी तिकडे मोर्चा वळवला. त्यांना भालदारपुरा येथील त्यांचेच समाजबांधव आडवे आले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक आणि त्यांना थांबवणाऱ्यांची स्थानिकांची संख्या कमी, असे चित्र होते. त्यामुळे जे नको होते तेच झाले.
मी येथे २० वर्षांपासून राहतो. आमचे जितके चांगले संबंध आमच्या समाजाशी आहेत त्यापेक्षा अधिक चांगले संबंध येथील अल्पसंख्याकांशी आहेत. मी आता मदतीसाठी हाक दिली तर सर्वात आधी धावून येणारे अल्पसंख्यकच असतील. दंगल झाल्यानंतर मी त्या सर्वांना जाऊन भेटलो. दंगलखोरांमध्ये स्थानिक लोकांचा समावेश नाही. माझ्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये फुटेज आहेत. जेव्हा माझ्या दुकानावर दगड मारले जात होते तेव्हा अल्पसंख्याक समाजातील लोकांनीच दगड मारणाऱ्यांना आवरले. दंगलखोर आतील गल्लीत शिरल्यावर त्यांना याच लोकांनी बाहेर काढले. मी ही स्थिती डोळ्यांनी बघितलेली आहे, असेही या युवकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.
वाढदिवसाला घेतलेली कार फोडली
मुलाच्या वाढदिवसानिमित्त कार घेतली. जेमतेम एक महिना झाला होता. दंगलीत ती नवीन कोरी कार फोडण्यात आली. त्याचे दु:ख आहे, असे चिटणवीस चौकाकडून शुक्रवारी तलावाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका व्यावसायिकाने सांगितले.
सौहार्दाची भावना द्वेषात बदलली
भालदारपुरा, जुना हिस्लॉप कॉलेज परिसर आणि जोहरीपुरा येथे पिढ्यानपिढ्या शेजारी-शेजारी राहणारे आणि सामाजिक, आर्थिक, धार्मिक व्यवहार कायम असलेल्या बहुसंख्य समाजातील नागरिकांमध्ये आता अल्पसंख्य समाजातील लोकांबाबत अविश्वास वाढला आहे. दंगलीमुळे लोकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. चिटणवीसपुरा चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावरील एका दुकानदाराची प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. तो म्हणतो, भालदारपुरा, जोहरीपुरा येथील अल्पसंख्यकांशी चांगले संबंध आहेत. त्यांना ८०-९० टक्के व्यवसाय याच समाजाकडून मिळतो. मात्र, दंगलीनंतर या समाजाविषयीचे मत बदलले आहे. त्यांना जे करायचे होते ते केले. आता आम्हाला या विषयावर अधिक बोलायचे नाही. नाही तर ते लोक आमच्याविषयी आकस बाळगतील.
सरकारवर विश्वास नाही
या भागातील अनेक दुकानदारांचे दंगलीत नुकसान झाले. आता सरकार आरोपींची मालमत्ता विकून नुकसान भरपाई देण्याचे सांगत आहे. परंतु, नुकसानग्रस्तांना ही घोषणा फारसी रूचलेली नाही. मालमत्ता विकणार केव्हा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळणार केव्हा, असा त्यांचा सवाल आहे. भरपाईची वाट न पाहता दुकानातील फुटलेले कॅमेरे, मोडतोड झालेले वाहन त्यांनी स्वत:च दुरुस्तीला दिले आहेत.