नागपूर : भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. केवळ चोरीच्या आरोपावरून भिक्षा मागून, प्लास्टीकचा कचरा गोळा करून स्वत:चा उदरनिर्वाह करणाऱ्या सोनझारी समाजाच्या एक तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. तर अन्य तीन तरुणांना बेदम मारहाण झाली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना धार्मिक वादातून तर झाली नाही ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत १४ आरोपी ताब्यात आहेत.

भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील चोरीच्या प्रकरणावरून १३ एप्रिलला रात्री चौघांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी १६ लोकांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील मुख्य आरोपीला अटक करा आणि त्यात गोवलेल्या इतरांना सोडा, अशी मागणी करीत नागरिकांनी रास्ता रोको केला. १३ एप्रिलच्या मध्यरात्री हा मारहाणीचा प्रकार घडला होता. वेल्डिंग वर्कशॉपसमोरून रोज लोखंड चोरीस जात असल्याने पाळत घेऊन त्या रात्री चार व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना पोलिसांत न देता बेदम मारहाण करण्यात आली. यात मोहंमद मुबारक सय्यद याच्यासह चारही व्यक्ती जखमी अवस्थेत पडून होते.

गस्तीवरील पोलिसांनी त्या सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यात १५ एप्रिलच्या सकाळी मोहंमद मुबारक सय्यद (सोनझारी) याचा मृत्यू झाला तर अन्य सहकारी सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. याप्रकरणात, पोलिसांनी मुख्य आरोपीसह गावातील निरपराध लोकांनाही संशयावरून ताब्यात घेतल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. मुख्य आरोपीला अटक करून इतरांना सोडावे, अशी गावकन्यांची मागणी आहे. दरम्यान, दोन व्यक्तींना पोलिसांनी सोडले. एका आमदाराशी जवळीक असल्याने पोलिसांना त्यांना सोडले, इतरांवर अन्याय का, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच, अड्याळ पोलिसांनी गावाला भेट देऊन गातकन्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गातकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आपल्या मागणीसाठी काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. यामुळे वाहतूक खोळंबून पडली होती. या संपूर्ण प्रकरणात मृत पावलेल्या मोहंमदला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या हाताची बोटे तोडण्यात आली. तसेच त्याच्या शरीरावर ब्लेडने वारही करण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना धार्मिक वादातून झाली का? अशी चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.

गावात तणावपूर्ण शांतता

दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसत आहे. १४ व्यक्तींना संशयावरून ताब्यात घेतल्याने गावकरी संतप्त आहेत. त्याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्यांवर काय कारवाई केली हे कळू शकले नाही. तथापी काही राजकीय मंडळी या घटनेला खतपाणी घालत असल्याची चर्चाही गावात आहे. रास्ता रोकोनंतर पोलिसांनी भेट दिल्यावर वाहतूक सुरळीत झाली.