गडचिरोली : ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी (२२ रा. मालेगाव जि.नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला.

हेही वाचा…Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…

दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४०(१),६५ (१) भारतीय न्याय संहिता,सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे.आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला १३ जानेवारी रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले.

ग्रामीण भागातही ‘ऑनलाईन’चा विळखा

एरवी समाज माध्यमावर झालेल्या ओळखीतून अत्याचार झाल्याचा घटना शहरी भागात दिसून येतात. मात्र, याचे लोन गडचिरोलीतील ग्रामीण भागातही पसरल्याचे चित्र आहे. अहेरीतील घटनेने पालकांना धक्का बसला आहे. यापूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मधल्या काळात वृद्धांचीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे प्रकरण देखील समोर आले होते. परंतु आता यामाध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येत आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…

यातील केवळ काहीच प्रकरणाचा उलगडा होतो तर अनेक प्रकरणात सामाजिक प्रतिष्ठेमुळे पालक तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन पाल्यांना मोबाईल देत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून केल्या गेले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth of nashik came to aheri and raped minor girl due to friendship made through online gaming called free fire ssp 89 sud 02