लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: फेसबुकवर ओळख झाल्यानंतर युवकाने बारावीच्या विद्यार्थिनीला जाळ्यात ओढून बलात्कार केला. त्यातून ती दोन महिन्यांची गर्भवती झाली. पोटात दुखत असल्यामुळे ती आईसह मेयो रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी गर्भवती असल्याचे निदान केल्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. अखिल राजू नागवंशी (२०, समतानगर, जरीपटका) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी ईशा (बदललेले नाव) ही बारावीत शिकते. तिची फेसबुकवरून अखिल नागवंशी याच्याशी ओळख झाली. अखिल हा कोराडीतील एका बेकरीत काम करतो. दोघांची मैत्री झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला ऑगस्ट २०२२ मध्ये फिरायला जायचे सांगून घरी नेले. स्वतःच्या घरी त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा… नागपूर: झटपट पैसा व महागडे शौक पूर्ण करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणी देहव्यापारात

त्यानंतर ते दोघेही प्रेमसंबंधात होते. गेल्या आठवड्यात पोटात दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे केली. तिला मेयो रुग्णालयात नेण्यात आले. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे तिच्या आईने विचारपूस केली असता अखिलचे नाव समोर आले. तिच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अखिलला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth raped the 12th standard student and she became pregnant in nagpur adk 83 dvr