सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या एक पबमध्ये ५ ते ६ बाऊन्सर्सनी एका युवकाला जबर मारहाण केली. या मारहाणीची चित्रफित समाजमाध्यमांवर वेगाने फिरत आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती देण्यास सोनेगावचे ठाणेदार बळीराम परदेशी टाळाटाळ करीत आहेत.
हेही वाचा >>> शिक्षकी पेशाला काळिमा! चौथीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलींवर दोन नराधम शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील पब आणि हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन आणि शाळकरी मुले-मुलींची गर्दी वाढली होती. अंबाझरीतील एका पबमध्ये ३० ते ४० महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी दारुच्या नशेत सापडल्या होत्या. तसेच अनेक पबमध्ये अश्लील कृत्य आणि मद्यप्राशन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रकार सुरु होते. शहरातील अनेक ठाणेदारांनी पब आणि बारमालकांशी आर्थिक संबंध ठेवून अशा गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब, बारसाठी काही आदेश काढले आहेत.
हेही वाचा >>> नागपूर : नववीतली मुलगी, इंस्टाग्रामवर फ्रेन्डशिप अन न्यूड व्हिडिओ कॉल…
गेल्या दोन दिवसांपूर्वी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ परीसरात असलेल्या एका पबमध्ये २५ वर्षीय युवक गेला होता. त्या युवकाला पबच्या प्रवेशद्वाराजवळ काळ्या कपड्यांमध्ये असलेले बाऊन्सर्स बेदम मारहाण करीत होते. त्यामध्ये एका महिला बाऊन्सरचाही समावेश होता. त्या युवकाला मारहाण होत असल्यामुळे काहींनी भ्रमणध्वनीने छायाचित्र आणि चित्रफिती तयार केल्या. अशीच मारहाणीची चित्रफित सध्या समाजमाध्यमावर वेगाने पसरत आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सोनेगावचे ठाणेदार बळीराम परदेशी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.