खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्या व्यक्तीवर एका युवकाने चाकूने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. सूजल हरिष पटेल (१९, रा. काचीपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानूज चित्रसेन पटेल (४६, काचीपुरा) आणि त्यांच्या तीन मित्रांनी तीन वर्षांपूर्वी हरिष पटेल याचा खून केला होता. त्यावेळी सूजल हा १६ वर्षांचा होता. हरिष हत्याकांड प्रकरणाचा गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये न्यायालयातून निकाल लागला.
हेही वाचा >>> दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात; देशातील संख्या आता २० वर
सबळ पुराव्याअभावी चारही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र, काचीपुऱ्यातील वातावरण बघता रामानूज आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील रिवा येथे निघून गेले. मात्र, मुलाच्या शाळेच्या कामानिमित्त रामानूज यांना नागपुरात परत यायचे होते. तीन महिन्यांनंतर रामानूज हे नागपुरात परत आले. ही खबर सूजल पटेल याला मिळाली. वडिलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या मानसिकतेत असलेल्या सूजलने शुक्रवारी रात्री दहा वाजता रामानूजचे घर गाठले. चाकू घेऊन सूजल रामानूजच्या घरात घुसला.“तुने मेरे बाप का मर्डर किया, अब तेरा मर्डर होगा’ अशी धमकी देऊन चाकूने हल्ला केला. रामानुजची पत्नी मनिषा हिने आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यामुळे रामानूजचा जीव वाचला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.