नागपूर : नेहमी गजबजलेल्या धरमपेठ सारख्या उच्चभ्रू वस्तीत काही टारगट युवकांची टोळी मध्यरात्रीनंतर शर्ट न घालता नेहमी गोंधळ घालते. वस्तीतील नागरिकांना त्रास व्हावा, या उद्देशाने मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे, कार रेसींग करणे किंवा आरडाओरड करतात. या टोळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या युवकांच्या टोळीचा गोंधळ पहाटेपर्यंत सुरु असतो. त्यामुळे या परिसरातील पोलिसांच्या गस्तप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. गृहमंत्र्याच्या शहरात नागरिक दहशतीत वावरत असल्यामुळे शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरला झाला असून त्यात धरमपेठ परिसरातील गल्ली क्रमांक चारमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर सात ते आठ युवक रस्त्यावर कार उभी करताना दिसत आहेत. सर्व युवकांनी अंगातील शर्ट काढून पँटवर फिरताना दिसत आहेत. कारमधील गाण्यांचा मोठ्याने आवाज असून एकमेकांना शिविगाळ करताना दिसत आहेत. एक युवक कारमध्ये बसून दारुवजा काहीतरी पेय पिताना दिसत आहेत. तर काही युवक सिगारेट ओढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वस्तीतील एका सुजान नागरिकांना काढला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. काही युवक मोठमोठ्याने शिविगाळ करुन वस्तीतील नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करीत आहेत. असा प्रकार अनेकदा मध्यरात्रीनंतर होत असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या टोळीमुळे अनेक जण त्रस्त असून पोलिसांचे अशा घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाच्या दहशतीमुळे नागरिक त्यांना जाब विचारु शकत नाही. अन्यथा वाद-विवाद किंवा हाणामारी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांची गस्त गेली कुठे?

 धरमपेठमधील गल्ली क्रमांक चारमध्ये असा प्रकार अनेकदा घडत असतो. युवक शर्ट काढून अश्लील हातवारे करुन वस्तीत गोंधळ घालतात. शिवीगाळ करुन नागरिकांना त्रस्त करतात. असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांची प्रत्येक परिसरात गस्त घालणे अनिवार्य असते. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीकडे मात्र पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षाव्यवस्था धोक्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात माहिती घेतोय. सीसीटीव्ही फुटेजवरुन काय प्रकार आहे, ते बघावे लागेल. जर सार्वजनिक शांतता भंग करणारे कृत्य असेल तर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.  – विवेक राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबाझरी पोलीस स्टेशन, नागपूर.