नागपूर : राज्यातील एकोणसाठ शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर ६ हजार ८३० पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास शासनाने जुलै २०२४ मध्ये मान्यता दिली होती. येथील अकरा महिन्यांच्या कंत्राटी भरतीसाठी उमेदवारांची आर्थिक लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्या उमेदवारांकडून नोकरी नियमित असल्याचे आश्वासन देऊन दीड ते तीन लाख रुपये घेत असल्याचे खुद्द पैसे देणाऱ्या तरुणांनीच सांगितले. ऑनलाईन पैसे दिल्याचे पुरावेही त्यांच्याकडे आहे.
कामगार विभागाच्या १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. परंतु, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांच्या विरोधानंतर राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतला. परंतु, शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही. शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर ६ हजार ८३० पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास जुलै २०२४ मध्ये शासनाने मान्यता दिली.राज्यातील ५९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यानंतर मागील चार महिन्यांपासून या ५९ रुग्णालयांमध्ये विविध पदांची मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्या तरुणांनी भरतीसाठी संपर्क केला त्याला दीड ते तीन लाख रुपये मागितले जात आहेत. अकरा महिन्यांसाठी ही कंत्राटी भरती असतानाही एकदा लागल्यावर कुणीही काढू शकणार नाही, असे खोटे स्वप्न दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. वाढती बेरोजगारी आणि शासकीय नोकरीच्या स्वप्नाला बळी पडत उमेदवारही पैसे देत असल्याची माहिती आहे.
मध्यस्थींचा सुळसुळाट
बाह्यस्त्रोत कंपनीकडून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देणारे अनेक मध्यस्थीही विविध जिल्ह्यात आहेत. ‘क’ दर्जाच्या भरतीसाठी तीन लाख तर ‘ड’ संवर्गातील भरतीसाठी दीड लाख रुपयांचा दर ठरवण्यात आला आहे. ‘लोकसत्ता’च्या हाती लागलेल्या माहितीनुसार काही उमेदवारांनी मध्यस्थींना ऑनलाईन पैसे पाठवले असून त्याचे पुरावेही आहे.
या पदांचा समावेश
या भरतीमध्ये ‘गट-क’ प्रवर्गातील १७३० तर ‘गट- ड’ प्रवर्गात ५१०० पदांचा समावेश आहे. ‘गट-क’मध्ये लघुलेखक, वाहन चालक, शस्त्रक्रियागृह सहायक, ग्रंथपाल सहायक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा साहाय्यक, आरोग्य शिक्षक, लघुटंकलेखक अशा कुशल अणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
वैद्यकीय खात्याचा प्रतिसाद नाही
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क आणि संदेश पाठवला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.