नागपूरमधील घटना; मारेकऱ्यांना तीन फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार
युग मुकेश चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांनी दोन्ही आरोपींना अपहरण आणि खुनाच्या आरोपात दोषी ठरवले. आरोपींविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप सरकारी पक्षाने साक्षीपुराव्याच्या आधारे सिद्ध केले असल्याचा निकाल देत येत्या ३ फेब्रुवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
डॉ. मुकेश चांडक आणि डॉ. प्रेमल चांडक हे दाम्पत्य व्यवसायानिमित्त नागपुरात स्थायिक झाले. त्यांचे वर्धमाननगर भागात दंत रुग्णालय आहे. युग हा सेंटर पॉईंट शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. १ सप्टेंबर २०१४ रोजी संध्याकाळी तो शाळेच्या बसमधून घरासमोर उतरल्यावर आरोपी राजेश उर्फ राजू डवारे (२०,रा. वांजरी लेआऊट, कळमना) आणि अरविंद अभिलाष सिंग (१९, प्रीती लेआऊट, नारा रोड, जरिपटका) या दोघांनी युगचे अपहरण केले.
ते त्याला दुचाकीवरून नागपूरपासून २७ कि.मी.वर पाटणसावंगी परिसरात घेऊन गेले. तेथे लोणखरी परिसरातील एका नाल्यात युगचा खून करून त्याचा मृतदेह तेथेच वाळूत पुरला. युगला संपविल्यानंतर आरोपींनी डॉ. महेश चांडक यांना भ्रमणध्वनी करून प्रथम १० कोटी आणि नंतर ५ कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली होती.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबरला आरोपींनी पोलिसांसमोर युगचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर २ सप्टेंबरच्या रात्री आरोपींनी युगचा पुरलेला मृतदेह पोलिसांना दाखविलाही होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा