लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्रातून इतर राज्यात वाघ स्थलांतरित करण्याच्या पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे. राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या दोन्ही वाघिणी जंगलात सोडण्यात आल्या आहेत. ताडोबातून नेण्यात आलेली दुसरी वाघीण ‘झीनत’ नुकतीच सिमिलीपालच्या राखीव जंगलात सोडण्यात आली.
महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून १३ नोव्हेंबरला ‘झीनत’ या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. या वाघिणीला रायपूर, संबलपूर, यशीपूर मार्गाने वनखात्याच्या विशेष वाहनाने ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात आणण्यात आले. तत्पूर्वी ताडोबा व सिमिलीपाल वनखात्याच्या पथकाने वाघिणीला कोणतीही इजा न करता जेरबंद करण्याची मोहीम फत्ते केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या वाघिणीला सिमिलीपाल येथे आणले. या व्याघ्रप्रकल्पाच्या आत तयार करण्यात आलेल्या खुल्या पिंजऱ्यात तिला ठेवण्यात आले होते. याठिकाणी तिने शिकार केली होती. त्यामुळे तिला राखीव जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता ‘झीनत’ या वाघिणीला सिमिलीपालच्या उत्तर विभागातील गाभा क्षेत्रात नेण्यात आले आणि राखीव जंगलात सोडण्यात आले. दरम्यान, वनखात्याची तिच्यावर करडी नजर असणार आहे.
आणखी वाचा-चिमुकल्याला झाडामागे फेकून आई झाली पसार… अंगावरील जखमांना मुंग्या…
प्रकल्प काय?
ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या संख्येला पुरक आणि अनुवंशिक विविधता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याने त्यासाठी परवानगी दिली. २० ऑक्टोबरला या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि २६ ऑक्टोबरला ताडोबातून दोन ते तीन वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. रेडिओ कॉलर लावल्यानंतर या वाघिणीला सिमिलीपाल येथे स्थलांतरित करण्यात आले. ही वाघीण आता त्या जंगलात स्थिरावली आहे. दरम्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी, १३ नोव्हेंबरला ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून दूसऱ्या वाघिणीला देखील जेरबंद करण्यात आले होते. ही वाघीण देखील आता सिमिलीपालच्या जंगलात स्थिरावली आहे. ओडिशा व महाराष्ट्र वनविभागाच्या पथकाने या दोन्ही मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या.
आणखी वाचा-नागपुरात मराठी संस्काराचे दर्शन, काँग्रेस उमेदवार बंटी शेळके आणि प्रवीण दटकेंनी…
भारतातील एकमेव व्याघ्रप्रकल्प
ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या अनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.