नागपूर : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते. महाराष्ट्रात येत्या ३ ते ३१ मे पर्यंत असे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात तीन ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तीन मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५.६ अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे.
एका अक्षांशवर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी बारा ते १२.३५ दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळय़ा जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
केव्हा. कुठे..
३ मे – सावंतवाडी, शिरोडा, मांगेली, खूषगेवाडी
४ मे – मालवण, आंबोली
५ मे – देवगड, राधानगरी, रायचूर
६ मे – कोल्हापूर, इचलकरंजी,
७ मे – रत्नागिरी, सांगली, मिरज
८ मे – कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
९ मे – चिपळूण, अक्कलकोट
१० मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर
११ मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई
१२ मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद
१३ मे – पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली
१४ मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई,
१५ मे -मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्धी, सिरोंचा
१६ मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड,
१७ मे – नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली,
१८ मे – पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
१९ मे – औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी
२० मे – चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल
२१ मे – मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना,
२२ मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड
२४ मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर
२५ मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा
२६ मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
२७ मे – नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
२८ मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड,
२९ मे – बोराड, नर्मदा नगर,
३० मे – धाडगाव
३१ मे – तोरणमाळ
महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस
शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते.
Written by लोकसत्ता टीम
![महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/04/nagpur-2-maharshtra.jpg?w=1024)
First published on: 30-04-2022 at 00:09 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero shadow day may maharashtra sun earth summer heat temperature amy